पाटणा : मतचोरीचा ॲटमबॉम्ब आम्ही भाजपवर फेकला होता, आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फेकणार आहोत. भाजपने मतचोरी करून निवडणुका कशा जिंकल्या हे उघड करू. मग, मोदींना चेहरा दाखवायला ही जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा देत काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप व केंद्र सरकारवरील दबाव वाढवला.
काँग्रेसच्या बिहारमधील दोन आठवड्यांच्या व्होटर अधिकार यात्रेची सोमवारी पाटणामध्ये सांगता झाली. गांधी मैदानावर महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर आंबेडकर पार्क पर्यंत यात्रा काढली गेली पण,काही अंतरावर असलेल्या डाक बंगला येथे ही यात्रा अडवली गेली. तिथेच उभारलेल्या व्यासपीठावर उपस्थित जनसमूहासमोर भाजपवर हल्लाबोल केला. मतचोरीचे आणखी पुरावे देऊन भाजप व केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमताने केलेले घोटाळे लोकांसमोर उघड करू, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी कोणत्या मतदारसंघाामधील मतचोरी उघड केली जाईल हे स्पष्ट केले नाही. पण, आरा येथील जाहीरसभेमध्ये महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमधील मतचोरी लवकरच उघड केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे या दोन राज्यांमधील मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब काँग्रेसकडून फोडला जाण्याची शक्यता असल्याचे मानले जाते आहे.
जनसभेत इंडिया आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. राहुल गांधींनी या पक्षांचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा पुनरूच्चार केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने निवडणूक जिंकली होती पण हीच, जरूर आघाडी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली, त्यामागे एकमेक कारण म्हणजे भाजप व केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमताने मतांची चोरी केली. चार महिन्यामध्ये १ कोटी मतदार वाढले. महाविकास आघाडीचा लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत मतांचा टक्का सारखाच होता, बनावट नवे मतदारांची मते भाजपला मिळाली म्हणून आम्ही महाराष्ट्रात हरलो. पण बिहारच्या जनतेने भाजपची चलाखी लक्षात घेतली पाहिजे. बिहारमध्ये महागठबंधन मतांची चोरी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली.
राहुल गांधींचे भाषण सुरू असताना काही तरुणांनी काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावर राहुल गांधींनी, भाजपवाले मला काळे झेंडे दाखवत आहेत पण हायड्रोजन बॉम्ब आम्ही फेकणार आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे म्हणत बिहार व केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या एनडीए आघाडीला गर्भित इशारा दिला.
यात्रेच्या सांगता समारंभात महागठबंधनचे सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. याशिवाय, इंडिया आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाकपचे महासचिव डी. राजा, तृणमूल काँग्रेसच्या वतीने युसूफ पठाण आदी नेतेही उपस्थित होते.