१८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रातला तिसरा दिवस आज पार पडला. मागचे दोन दिवस खासदारांचे शपथविधी झाले. यावेळी सर्वात पहिला शपथविधी हा नरेंद्र मोदींचा होता. नरेंद्र मोदी शपथविधीसाठी आले तेव्हा राहुल गांधींनी त्यांना संविधान दाखवलं. तसंच अयोध्येच्या खासदाराला ते बरोबर घेऊन बसले होते. यावरुनच राहुल गांधी हे आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवतील हे स्पष्ट झालं होतं. आज ओम बिर्ला यांची निवड लोकसभेच्या अध्यक्षपदावर झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. तुमच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल असं म्हटलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ओम बिर्लांचं अभिनंदन केलं. पण त्यांनी टोलाही लगावला.

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचं हस्तांदोलन

राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर ओम बिर्ला यांचं अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि संसदीय कार्यमंत्री रिजिजू गेले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला होता. राहुल गांधींचा उल्लेख मोदींना ‘शहजादा’ असा केला होता. तर पंतप्रधान मोदी हे तिरस्कार पसरवत आहेत, आमची लढाई विचारधारांची आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. याशिवाय इतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. आज लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- “हा तर फक्त ट्रेलर…”, राहुल गांधी – नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो पोस्ट करून संजय राऊतांचा इशारा; म्हणाले…

काय म्हणाले राहुल गांधी?

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज सरकारकडे बहुमत आहे, संख्याबळ आहे. पण विरोधक अर्थात इंडिया आघाडीही जनतेचा आवाज आहे. संख्याबळावर विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. मला आशा आहे की लोकसभा अध्यक्ष जनतेचा आवाज लोकसभेत उठवू देतील. विरोधकांचा आवाज दाबणं हे लोकशाही विरोधी आहे. त्यांना गप्प बसवून संसद चालवता येणार नाही. विरोधक सरकारला सहकार्य करायला तयार आहे मात्र आम्हाला बोलण्याची संधी, आमची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. या आशायचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मिळवलं चांगलं यश

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३० हून अधिक जागा मिळवत भाजपाला टक्कर दिली. काँग्रेसला ९९ खासदार निवडून आणता आले. या लोकसभा निवडणुकीने इंडिया आघाडीला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करुन दिला आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाल संख्याबळ गाठता आलं होतं. या निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएसह भाजपाने २९४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकले आहेत. मात्र विरोधकांनी मारलेली मुसंडी चर्चेत आहे. तसंच अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना बघायला मिळेल यात शंका नाही. राहुल गांधींचं हे वक्तव्य त्याचीच झलक दाखवणारं ठरलं आहे.