पीटीआय, अरारिया (बिहार)
केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप यांची भागीदारी आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी व्होटर अधिकार यात्रेदरम्यान केला. बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) नावाखाली मतांची संस्थात्मक चोरी होत असल्याचा आरोप करत, ती उधळून लावण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

बिहारमध्ये राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’चा दुसरा टप्पा रविवारी पूर्ण झाला. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राहुल गांधी म्हणाले की, जनता या यात्रेमध्ये स्वतःहून सहभागी होत आहे. ‘व्होट चोर, गद्दी छोड,’ ही घोषणा आता सहा वर्षांच्या मुलांच्या ओठांवरही असल्याचा दावा राहुल यांनी केला.

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव रविवारी मोटारसायकलींवर स्वार होऊन पूर्णिया जिल्ह्यातून अरारियामध्ये पोहोचले. तिथे पत्रकार परिषदेत, बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करण्यास काँग्रेस उत्सुक का नाही या प्रश्नाचे थेट उत्तर देणे राहुल यांनी टाळले. मात्र, ‘इंडिया’ आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “इंडिया आघाडीचे सर्व भागीदार पक्ष परस्पर आदराने एकत्रित काम करत आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही तणाव नाही. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत आणि निकाल चांगला लागेल.” विधानसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा समिती काम करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी याच स्वरूपाचे आरोप केले होते. पण, त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागितले गेले नाही. बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे वगळल्याबद्दल भाजपने तक्रार केलेली नाही. यावरून भाजप आणि निवडणूक आयोगादरम्यानची छुपी भागीदारी दिसून येते. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

९८ टक्के मतदारांची कागदपत्रे प्राप्त

नवी दिल्ली : बिहारमधील ९८.२ टक्के मतदारांची कागदपत्रे आधीच प्राप्त झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली. ‘एसआयआर’मधून वगळलेल्या मतदारांनाही आधारसह आयोगाने निर्धारित केलेल्या १२पैकी एक कागदपत्र सादर करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. कागदपत्रे सादर करण्याची मुदत १ सप्टेंबरपर्यंत आहे.