Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधले घोळ एकाच मतदारसंघाचं उदाहरण देत समोर आणले आहेत. एकाच मतदारसंघात एक लाख मतांची चोरी कशी करण्यात आली ते राहुल गांधी यांनी उदाहरणांसह दाखवून दिलं आहे. तसंच एका प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. जर अंपायरच भाजपाच्या बाजूने खेळत असेल तर बदलांची अपेक्षा कशी करायची असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मतांची चोरी पाच मार्गांनी करण्यात आली? काय आहे राहुल गांधींचा दावा?

डुप्लिकेट व्होटर्स, एक मतदाराचं नाव मतदार यादीत जास्तवेळा येणं.

खोटे पत्ते आणि तपशील : मतदारांचे खोटे पत्ते देऊन आणि बनावट ओळख निर्माण करुन

एकाच पत्त्यावर ५० ते ६० लोक राहात असल्याचं दाखवण्यात आलं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ४ ते ५ लोकच राहात होते.

चुकीचे फोटो, असे फोटो वापरण्यात आले जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाहीत. असे फोटो जे नीट ओळखताच येणार नाहीत.

फॉर्म ६ चा दुरुपयोग करुनही मतदार याद्यांमध्ये घोळ केला गेला. हे पाच मुद्दे राहुल गांधींनी समोर आणले आहेत. तसंच यानंतर त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्यात त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधींचं नेमकं विधान काय?

‘राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला की भाजपाचा विजय झाला की ईव्हीएम वर संशय घेतला जातो. काँग्रेसचा विजय झाला की काहीच बोलत नाहीत. बरं तुम्ही हे जे सांगत आहात त्यावर काही उपाय आहे का?’ असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत निवडणूक आयोगाने तडजोड केलेली आहे तोपर्यंत ईव्हीएम आणा किंवा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या काहीही विशेष घडणार नाही. निवडणूक आयोगाने तडजोड केली नसेल आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या गेल्या तर निकाल वेगळे लागू शकतात. मात्र इथे तर अंपायरच दुसऱ्या टीमच्या बाजूने खेळतो आहे. मग तुम्ही बनावट यादी दाखवा, इतर काही करा काहीच होणार नाही. तुम्हीच पाहा ना एका मतदारसंघात एक लाख मतदार बनावट आहेत. आम्ही घोटाळ्याचा पॅटर्न दाखवला आहे. भाजपा जिंकते आहे आणि काँग्रेसचा पराभव होतो आहे हा मुद्दाच नाही. भारतात निवडणुका मॅनेज होत आहेत त्याचा पुरावा मी आता तुमच्यासमोर सादर केला.”