पीटीआय, नवी दिल्ली

‘भाजपचे लोक हिंसाचार आणि द्वेष पसरवतात. त्यांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे समजत नाहीत,’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. गुजरातमधील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित दगडफेकीचा निषेध करताना त्यांनी ही टिप्पणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल यांनी लोकसभेत केलेल्या कथित ‘हिंदूविरोधी’ वक्तव्या विरोधात अहमदाबाद गुजरात प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी दगडफेक करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रदेश कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, ‘‘गुजरात काँग्रेस कार्यालयावरील भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराविषयीचे माझे मत आणखी मजबूत केले आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. गुजरातची जनता त्यांचा खोटेपणा स्पष्टपणे पाहू शकते आणि त्यासाठी ते भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवतील.