ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गायब झालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तब्बल ५६ दिवसांच्या अज्ञातवासानंतर दिल्लीत परतले. दीर्घ सुट्टीवर गेलेल्या राहुल यांच्याविषयी काँग्रेस नेत्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. राहुल कुठे गेले; याची माहिती कुणालाही नव्हती. गुरुवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या राहुल यांनी तडक तुघलक रस्त्यावरील घर गाठले. तेथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व प्रियंका गाधी उपस्थित होत्या. राहुल मायदेशी परतल्याचे वृत्त धडकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. राहुल कधी म्यानमारमध्ये तर कधी बँकॉकमध्ये असल्याच्या वावडय़ा उठत होत्या. राहुल  बँकॉकमाग्रे म्यानमारमधून मायदेशी परतल्याचा दावा काँग्रेस नेते करीत आहेत.
राहुल गांधी थाई एअरवेजच्या विमानाने बँकॉकहून दिल्लीत  परतले. राहुल यांच्या ‘घरवापसी’वर एकाही काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मात्र गेल्या ५६ दिवसांच्या काळात राहुल यांच्याविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. पक्षात सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या वाढलेल्या प्रभावामुळेच राहुल गांधी दीर्घ सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरू होती.
म्यानमारमध्ये विपश्यनेसाठी राहुल गेले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशना  दरम्यान राहुल यांच्या अनुपस्थितीवर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. गांधी परिवाराच्या निकट असलेल्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीदेखील राहुल यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले होते. विशेष म्हणजे जमीन अधिग्रहण विधेयकावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने १९  एप्रिल रोजी आयोजित केलेल्या संघर्ष सभेला राहुल अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र माजी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी यांनी ती फेटाळली होती.
राहुल गांधी सुट्टीवर असताना पक्षात अनेक संघटनात्मक बदल करण्यात आले होते. ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात व दिल्लीत नेतृत्व बदल करण्यात आले होते. आता राहुल परतल्याने मोठय़ा प्रमाणावर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. त्यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षनेत्यांशी आज चर्चा
राहुल गांधी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे, तसेच रविवारी भूसंपादन विधेयकाविरोधातील मेळाव्यात सहभागी होणार आहेत. काँग्रेस कार्यसमितीची लवकरच बैठक बोलावली जाणार आहे. यामध्ये काँग्रेस अधिवेशनाची तारीख तसेच ठिकाण ठरवले जाईल, असे एका नेत्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi was in myanmar
First published on: 17-04-2015 at 12:57 IST