‘भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था म्हणनू ओळखला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात स्त्रियांच्या प्रतिमेबद्दल यत्किंचितही आदर नाही. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर महिलांना स्थानही नाही’, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. येथे महिलांच्या एका मेळाव्यात ते सहभागी झाले होते.
भारतात लोकशाही आहे. आणि लोकशाहीतील निवडणुकांच्या पद्धतीद्वारे अधिकाधिक महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आणणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणाची अनिवार गरज असून, त्यासाठी आपला पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महासत्तेची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी इच्छा असेल, तर त्यासाठी महिलांचे सबलीकरण करणे आवश्यक आहे. जिथेजिथे महिलांना संधी मिळाली, त्या-त्या राज्यात त्यांनी संधीचे सोने केले आणि ती राज्ये प्रगतिपथावर नेली, असेही ते म्हणाले.
केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हेत, तर विधिमंडळे, संसद आणि राजकीय क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. संध्याकाळी, रात्री-अपरात्री, सार्वजनिक वाहतुकीच्या बसमधून महिलांना प्रवास करणे सुरक्षित वाटेल आणि असे वाटणारा दिवस फारसा दूर नाही, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले. संसदेत महिला आरक्षण विधेयक लवकरच संमत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.