रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांना मूलभूत सुविधांची समस्या भेडसावत असून लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील खानपान सेवेबद्दलही मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आल्या असल्याचे सोमवारी रेल्वे मंत्रालयाने मान्य केले. रेल्वेच्या डब्यातील आरोग्यास घातक स्थिती, दिवे, पंखे बंद असणे त्याचप्रमाणे खानपान सेवा दुय्यम दर्जाची असल्याच्या ५६७० तक्रारी प्रवाशांकडून रेल्वेकडे आल्या आहेत, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. या तक्रारींची तीव्रता पाहून संबंधित कंत्राटदारांवर दंड आकारणे अथवा प्रसंगी त्यांचे कंत्राट रद्द करणे अशा प्रकारची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल २०१२ ते ऑक्टोबर २०१४ या कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ५६१ प्रकरणांत दंड ठोठावण्यात आला आहे तर ६२३ प्रकरणांत संबंधितांना समज देण्यात आली आहे.