रेल्वे तिकिटांच्या विक्रीसोबतच प्रवाशांकडून रद्द करण्यात येणाऱ्या तिकिटांमधूनही रेल्वे प्रशासन मोठी कमाई करत आहे. आरक्षित तिकिटे रद्द केल्यावर रेल्वेकडून मूळ तिकीट किमतीच्या काही प्रमाणात शुल्क आकारणी केले जाते. या शुल्क आकारणीमुळे रेल्वेला २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात तब्बल १४.०७ अब्ज रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या उत्पादनात २५.२९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मध्यप्रदेशच्या निमच भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारांतर्गत उत्पन्नाबद्दलची माहिती दिली आहे. चंद्रशेखर गौड यांनी दाखल केलेल्या अर्जाला रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या अधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. प्रवाशांनी आरक्षित तिकिटे रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनाला २०१५-१०१६ या आर्थिक वर्षात ११.२३ अब्ज रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात आरक्षित तिकिटे रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वेला ९.०८ अब्ज रुपयांचा फायदा झाला. याआधी म्हणजेच २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात रेल्वेला ९.३८ अब्ज रुपयांचा नफा झाला होता. यासोबतच अनारक्षित तिकिटे रद्द करण्यात आल्यामुळेही रेल्वेच्या खजिन्यात मोठी भर पडत आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार अनारक्षित तिकिट प्रणालीनुसार बुक करण्यात आलेली तिकीटे रद्द करण्यात आल्यामुळेदेखील रेल्वे प्रशासनाला मोठा फायदा झाला आहे. रेल्वेने २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात १२.९८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर २०१३-२०१४ या कालावधीत प्रवाशांनी अनारक्षित तिकीटे रद्द केल्यामुळे रेल्वेला १५.७४ कोटी रुपयांचा नफा झाला. २०१४-१५ मध्ये रेल्वे प्रशासनाला १४.७२ कोटींचा फायदा झाला होता. २०१५-१६ या दरम्यान रेल्वेने १७.२३ कोटींची कमाई केली होती. तर २०१६-१७ या कालावधीत रेल्वेला १७.८७ कोटींचा फायदा झाला आहे.