विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले तर तो त्यांचा राजकारणातला डेड एंड असेल असं वक्तव्य भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे. राज ठाकरेंच्या सभांचा काहीही परिणाम झाला नाही. ज्या ठिकाणी मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली, सभा घेतल्या त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यांच्या सभांची चर्चा भरपूर झाली होती. त्यांच्या भाषणांना गर्दीही झाली होती मात्र गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होऊ शकलं नाही असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत अतुल भातखळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका या निवडणुकीच्यावेळी बदलली. पुलवामाचा हल्लाच मोदींनी घडवून आणला आहे अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली. एवढी टोकाची भूमिका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही घेतली नव्हती. तरीही ते त्यांचा करीश्मा दाखवू शकले नाहीत. राज ठाकरेंच्या पक्षाचा वैचारिक पाया काय? हे आता ठरवण्याची वेळ आली आहे. जर राज ठाकरे भविष्यात किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले तर तो त्यांचा डेड एंड ठरेल असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनीही दोनदा काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्षही स्थापन केला. मात्र मूळ विचार त्यांनी सोडला नाही. अशात राज ठाकरेंच्या पक्षाचा वैचारिक पाया काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याचं उत्तर त्यांना शोधावं लागेल असंही भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
सातत्याने जनाधार का कमी होत गेला ? याचा विचार राज ठाकरेंनी केला पाहिजे असं मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केला. नाशिकला जेव्हा मनसेची सत्ता आली तेव्हा नाशिककारांचा भ्रमनिरास झाला. मनसेचे आमदार निवडून येऊ शकले नाहीत. शरद पवारांचा आधार राज ठाकरेंनी घेतला. काँग्रेसला मनसे अडथळा वाटतो आहे कारण मराठीबाबत मनसेची किंवा राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती काँग्रेसला रूचणारी नाही. त्यामुळे विधानसभेसाठी जर राज ठाकरे गेले तर राष्ट्रवादीसोबत जातील असं वाटतं असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.