सोशल नेटवर्किंगवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील शेरगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर पोलीस स्थानकामध्ये जमीनीवर बसून आंदोलन करताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मीना यांच्या एका नातेवाईकावर वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई केली. याच कारवाईमुळे नाराज झालेल्या मीना यांनी रातानाडा पोलीस स्थानकामध्ये धरणे आंदोलन करत या कारवाईला विरोध केला. व्हिडीओमध्ये मीना यांचे पती उम्मेद सिंह चंपावतही त्यांच्यासोबत पोलीस स्थानकामध्ये बसून पोलीस कारवाईचा निषेध करताना दिसत आहेत.

पोलिसांनी जेव्हा मीना यांचा नातेवाईकांपैकी एक असणाऱ्या तरुणाला तपासासाठी रस्त्यात थांबवलं असता तो आपले राजकीय वजन किती आहे हे सांगू लागला. हा तरुण पोलिसांनाच परिणामांबद्दल सांगू लागल्यानंतर पोलिसांनी त्याला दंडाची पावती फाडण्यास सांगितलं. त्यानंतर या सर्व प्रकरणाची माहिती मीना कंवर यांना मिळाल्यानंतर त्या थेट पोलीस स्थानकात आल्या आणि केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जमीनवर बसून राहिल्या.

मीना यांनी आपल्या नात्यातील त्या मुलाने काही चुकीचं केलं आहे हे मान्य करण्यास तयार नव्हत्या. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार मीना या दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या त्या तरुणाची बाजू मांडताना दिसत आहेत. “सर्वांचीच मुलं पितात. यात काही विशेष नाही. मुलं आहेत काय फरक पडतो जर त्यांना थोडीफार दारु प्यायली तर?”, असा प्रश्न त्या व्हिडीओत युक्तीवाद करताना विचारत आहेत. मी तुम्हाला त्याला सोडण्याची विनंती केली होती. मुलं आहेत, थोडी प्यायली तर काय झालं?, असं मीना व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस स्थानकामध्येच या महिला आमदाराचा पती आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला. पोलीस स्थानकामध्ये येण्याआधी मीना यांच्या पतीने फोन करुन पोलिसांना धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये डीसीपींनी लक्ष घातल्यानंतर प्रकरण शांत झालं आणि मीना पोलीस स्थानकामधून घरी गेल्या.