मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर काँग्रेसने राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यावर १८००० कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तीन राज्यात विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कृषी कर्जमाफी जाहीर केली. सत्तेत येताच काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा केली आहे.

छत्तीसगडमध्ये शपथविधीनंतर काही तासांतच भूपेश बघेल यांनी ६१०० कोटींच्या कृषी कर्जमाफीची घोषणा केली. दहा दिवसांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे बघेल यांनी सांगितले होते. काँग्रेसच्या या तडकाफडकी कर्जमाफीनंतर भाजपाच्या आसाम सरकारने ८ लाख शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आणि गुजरात सरकारने ६.२२ लाख थकबाकीदारांचे ६२५ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.