Rajasthan Police Unique Punishment Criminals : राजस्थानमधील मेडता भागात पोलिसांनी तीन ठगांना धडा शिकवण्यासाठी त्यांची धिंड काढली आहे. या ठगांनी लॉटरीच्या नावाखाली एका वृद्ध व्यक्तीला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अशी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांची महिलांच्या पोशाखात मेडता बस डेपोपासून न्यायालयापर्यंत धिंड काढली. पोलिसांनी आरोपींचं मुंडन केलं, त्यांना सलवार सूट परिधान करायला लावले आणि गावभर लोकांची माफी मागायला लावली. पोलिसांनी या ठगांना ‘आमची चूक झाली, आम्हाला माफ करा’, अशा घोषणा द्यायला लावल्या.

ठग व इतर आरोपींच्या मनात भय निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. अशा कारवाईमुळे लोकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांकडून ठगांना अनोखी शिक्षा

नागौर जिल्ह्यातील मेडता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मृदुल कच्छावा यांच्या आदेशानुसारच इतकी कठोर कारवाई केल्याचं सांगितलं आहे. पोलीस उपअधीक्षक रामकरण मलिंडा म्हणाले, “अनिल सिंधी, पूरणमल व कूलभूषण शर्मा अशी आरोपींची नावं आहेत. अनिल जयपूरचा, तर पूरणमल अलवरचा रहिवासी आहे. तसेच कूलभूषण हा मूळचा खैरथल येथील रहिवासी आहे. या तिघांनी मिळून एका वृद्ध व्यक्तीला लॉटरीच्या नावाखाली दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे.”

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना पोलीस रिमांडमध्ये पाठवलं आहे. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्यासठी, लोकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपींना महिलांच्या वेशात बस डेपोपासून न्यायालयापर्यंत पायी नेलं व त्यांची धिंड काढली.

प्रकरण काय?

पोलीस उपअधीक्षक रामकरण मलिंडा म्हणाले, “२१ जुलै रोजी खेडली गावचे रहिवासी नाथू सिंह हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मेडता येथे आले होते. येथील कृषी सेवा केंद्राजवळ तीन तरुण उभे होते. त्यांच्याकडे लॉटरीची तिकीटं होती. या तिघांनी नाथू सिंह यांच्यासमोर खोटं लॉटरीचं तिकीट फाडण्याचं नाटक केलं. तसेच नाथू सिंह यांना लॉटरीचं तिकीट काढण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर नाथू सिंह यांना वेगवेगळी आश्वासनं देऊन व अमिष दाखवून त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले आणि तिथून फरार झाले. त्यानंतर नाथू सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी १० दिवसांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची धिंड काढत न्यायालयात हजर केलं.