जमिनीच्या वादातून हल्ले, हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कुटुंबातील व्यक्तीकडून हल्ले केले जातात. हत्या करण्यासाठी अनेक क्रूर मार्गांचा अवलंब केला जातो. राजस्थानमध्येही अशाचप्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केली आहे. आरोपीने त्याच्या भावाच्या अंगावरून तब्बल आठ वेळा ट्रॅक्टर चालवला. डोकं सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे राजस्थान हादरून गेला आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बहादूर सिंग आणि अतर सिंग या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद आहे. राजस्थानच्या भारतपूर येथे त्यांची जमीन आहे. आज सकाळी बहादूर सिंग कुटुंब या वादग्रस्त जागेवर ट्रॅक्टर घेऊन पोहोचले. थोड्याचवेळाने अतर सिंग कुटुंबही तिथे पोहोचले. दोन्ही कुटुंबिय एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांमध्येही भांडण सुरू झाले. या भांडणाचं पर्यवसन लाठ्यांच्या हल्ल्यांमध्ये झाला. एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली. तसंच, गावकऱ्यांनी याचकाळात गोळीबाराचाही आवाज ऐकला आहे.

हेही वाचा >> धक्कादायक! गरबा कार्यक्रमात लेकीची छेड काढणाऱ्या दोघांशी झालेल्या वादात वडिलांचा मृत्यू

या भांडणादरम्यान अतर सिंग यांचा मुलगा निरपत जमिनीवर पडला. त्यामुळे बहादूर सिंग यांचा मुलाने त्याच्यावर तब्बल आठवेळा ट्रॅक्टर चालवला. दामोदर असं आरोपीचं नाव असून कुटुंबियांनी याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतरही त्याने ट्रॅक्टर थांबवला नाही. परिणामी निरपतचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला आहे.

या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, पाच दिवसांपूर्वीही या दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. त्यावेळी बहादूर सिंग आणि त्यांचा लहान भाऊ जनक जखमी झाले होते. त्यामुळे या कुटुंबाने अतर सिंग कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता.