सुप्रसिद्ध राजस्थानी लेखक व साहित्य अकादमी पुरस्कारविजेते विजयदान देठा यांचे येथून जवळच असलेल्या बोरुण्डा गावी हृदयविकाराने रविवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन पुत्र व एक कन्या असा परिवार आहे.
राजस्थानातील लोककथांना आधुनिक पद्धतीने लिहून लोकप्रिय झालेले लेखक विजयदान देठा यांनी जवळपास ८०० लघुकथा लिहिल्या आहेत. ‘बिज्जी’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या देठा यांना नोबेल पारितोषिकासाठीही नामांकन मिळाले होते. शरतचंद्र चट्टोपाध्याय, अ‍ॅण्टोन चेकॉव्ह आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचे ते चाहते होते, तसेच त्यांचे प्रेरणास्थानही होते.
‘दुविधा’  देठा यांच्या गाजलेल्या कथेवर याच नावाचा चित्रपट १९७३ साली मणी कौल यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर याच कथेवर अलीकडे अमोल पालेकर यांनी शाहरूख खानला घेऊन ‘पहेली’ हा चित्रपट केला होता. हबीब तन्वीर यांनीही ‘चरणदास चोर’ या देठा यांच्या लोकप्रिय कथेचे रूपांतरण नाटकात केले होते. श्याम बेनेगल यांनीही या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपट केला. १९८९ साली प्रकाश झा यांनीही देठा यांच्या एका कथेवर ‘परिणती’ हा चित्रपट केला होता.
अनेक भाषांमध्ये विजयदान देठा यांच्या लोककथांची भाषांतरे झाली. ‘बापू के तीन हत्यारें’ हा १९४८ साली त्यांनी लिहिलेला समीक्षा ग्रंथ प्रचंड गाजला. कवी हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत आणि नरेंद्र शर्मा यांच्या साहित्यावर टीका करणारा हा ग्रंथ होता. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली असली तरी गांधीजींचा आत्मा या तीन साहित्यिकांनी संपवला आणि एकप्रकारे त्यांची हत्याच केली असे प्रतिपादन देठा यांनी केले होते. या साहित्यिकांनी गांधीहत्येनंतर दोन महिन्यांत गांधीजींवर पुस्तके लिहून बाजारात आणली.