भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज शुक्रवार एका कार्यक्रमात  काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या आधी  आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा असे खुले आव्हान केले आहे. ते भारत-अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभेत बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, “काँग्रेसमध्येही पंतप्रधान पदावरून मतभेद आहेत. त्यापक्षातही सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, पी.चिदंबरम आणि इतर असे अनेक दावेदार पंतप्रधान पदासाठी आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष पंतप्रधान उमेदवाराच्या बाबतीत गोंधळून गेला आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार काँग्रेस पक्ष जाहीर करु शकत नाही आणि जर तसे नसेल तर त्यांनी उमेदवार जाहीर करून दाखवावा.” असे आव्हान राजनाथ सिंह यांनी केले.
“भाजपमध्ये २००९ साली पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात पक्षाला कोणतीही अडचण आली नव्हती. त्याचबरोबर १९९९ साली ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात पक्षात कोणतेही दुमत नव्हते. मग काँग्रेस पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर का करू शकत नाही ? ही आमच्या पक्षाची प्रथा नाही. असे म्हणून काँग्रेस पक्ष घोटाळे आणि सुशासन राखण्यात आलेले अपयश यावर सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.” असेही राजनाथ सिंह म्हणाले.