संसदेतील कनिष्ठ सभागृह अर्थात लोकसभा एकीकडे ‘तेलंगण’ राज्याच्या मुद्दय़ावरून प्रचंड गदारोळाला सामोरी जात असताना, राज्यसभेत मात्र एक भावस्पर्शी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कधीही विसर्जित न होणारे सभागृह म्हणून ज्या सभागृहाचा उल्लेख केला जातो, त्या राज्यसभेतील ५४ खासदार मंगळवारी निवृत्त झाले. त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात अनेक नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरयाणा, हिमाचल प्रदेश यांच्यासह एकूण १८ राज्यांतील एकूण ५४ खासदारांचा कार्यकाल संपुष्टात आला. यावेळी निवृत्त होणाऱ्या खासदारांनी संसदेच्या कामकाजाचा वापर अधिक प्रभावीपणे आणि उपयुक्त पद्धतीने करावा, अशी सूचना केली. मात्र या ५४ पैकी १५ खासदार पुन्हा एकदा राज्यसभेसाठी निवडून आले आहेत.
‘आज निवृत्त होणाऱ्या खासदारांची भाषणे ऐकताना आपण एका समान धाग्याने जोडले गेलो होतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली’, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी निवृत्त होणारे खासदार कोणत्या ना कोणत्या मार्गाने जनतेची सेवा करीत राहतील, अशी आशा व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाचे जयप्रकाश नारायण सिंग यांनी संसदेच्या कामकाजाचे नियमन करण्याची गरज असून त्यादृष्टीने नवा कायदा करायला हवा, असे मतप्रदर्शन केले. आसाम गण परिषदेच्या बीरेंदर बैष्य यांनी ‘यापुढे ईशान्य भारताच्या समस्या मांडण्यासाठी मी येथे नसेन, पण माझ्या या सात बहिणींवर तुम्ही अन्याय होऊ देणार नाही’, अशी अपेक्षा निरोप घेताना व्यक्त केली.