गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यसभेत प्रलंबित असलेल्या अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयकावरील चर्चेला मंगळवारी राज्यसभेत सुरुवात झाली. हे विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यावर सर्वपक्षीय सहमती झाली आहे. चर्चेमध्ये भाग घेताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी माझ्या मुलीसोबत जर असे कोणी केले असते, तर मी त्याला गोळ्या घातल्या असत्या, असे सांगत हा विषय खूपच संवेदनशील असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, एक खासदार म्हणून मी असे बोलतोय, याचा अर्थ मी बेजबाबदार आहे, असा अजिबात होत नाही. मी कायद्याला घाबरणारा व्यक्ती आहे. पण ही घटनाच इतकी संवेदनशील आहे की त्यामुळे कोणतीही व्यक्ती आक्रमक होऊ शकतो. मलाही मुलगी आहे. तिच्यासोबत असे घडले असते, तर मी एकतर चांगल्यातला चांगला वकील दिला असता किंवा सरळ पिस्तूल घेऊन त्या व्यक्तीला गोळ्या घातल्या असत्या. हे विधेयक मंजूर व्हावे, यासाठी सर्वांनी खूप दिवस वाट बघितली आहे. अल्पवयीन न्याय मंडळाला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळूनच प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद म्हणाले, निर्भयाची आई केवळ तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत नाहीये. तर समाजामध्ये यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. अशा खटल्यातील आरोपींना इतर कैद्यांसोबत कोठडीत ठेवण्यात येऊ नये. तसे झाल्यास त्यांच्यातील क्रूरता आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2015 रोजी प्रकाशित
‘माझ्या मुलीसोबत असे घडले असते तर त्याला गोळ्या घातल्या असत्या’
विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यावर सर्वपक्षीय सहमती झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-12-2015 at 16:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha debates juvenile justice bill