राजस्थानमधील जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जाणारे राज्यवर्धनसिंह राठोड यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये क्रीडा आणि माहिती व प्रसारण या मंत्रालयाची धूरा सांभाळणारे राज्यवर्धनसिंह राठोड यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून राज्यवर्धनसिंह राठोड यांना राजस्थानमध्ये पक्षाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून राज्यवर्धनसिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. राज्यवर्धनसिंह यांच्याविरोधात काँग्रेसने कृष्णा पुनिया यांना रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे राज्यवर्धनसिंह राठोड- कृष्णा पूनिया यांचा २००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक चमूत समावेश होता. २०१४ मध्ये राज्यवर्धनसिंह राठोड तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत राज्यवर्धनसिंह यांना तब्बल ८ लाख २० हजार १३२ मते मिळाली होती. तर कृष्णा पुनिया यांना ४ लाख २६ हजार ९६१ मते मिळाली होती.
गुरुवारी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून यात राज्यवर्धनसिंह राठोड यांना स्थान मिळालेले नव्हते. राज्यवर्धन राठोड यांना उमेदवारी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या राज्यवर्धनसिंह राठोड यांना राजस्थानमधील महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Serving in @MIB_India allowed me to sit with great thinkers, hard working journalists and creative minds. They helped me become a better leader with their insights. I can't thank enough the team at I&B Ministry who helped us deliver our best.
— Col Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) May 31, 2019
मंत्रीपद हुकले तरी राज्यवर्धनसिंह राठोड यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी पहिल्या टर्ममध्ये मंत्रीपदावर संधी दिल्याबद्दल मोदींचे आभारही मानले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयात काम करत असताना मला देशातील विचारवंत आणि अथक परिश्रम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.