Ram Mandir Consecration Date: २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी वाजता, अभिजात मुहूर्तावर अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामलल्ला यांचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. पवित्र कार्यासाठी कोणताही वेळ काळ शुभच असला तरी नेमकी २२ जानेवारी ही तारीख का निवडली असावी याविषयी अनेकांना कुतूहल आहे. सहज म्हणून ही निवड झालेली नसून त्यामागे विशेष अर्थ आहे असे सध्या सांगण्यात येतेय. नेमकं असं या दिवशी काय खास असावं याविषयी जाणून घेऊया..

२२ जानेवारी २०२४ ही तारीख इतकी शुभ का?

शुभ मृगाशिरा नक्षत्र सोमवारी (२२ जानेवारी) पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल तर २३ जानेवारीला (मंगळवार) पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत कायम राहील. २२ जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी ११ :५१ ते दुपारी १२ :३३ पर्यंत आहे.

मृगाशिरा नक्षत्र हे सर्वात शुभ व ‘अमरत्वाचा देव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोमा या देवतेशी संबंधित आहे असे मानले जाते. या नक्षत्राचे चिन्ह अमृताच्या शाश्वत शोधाचे प्रतीक असलेल्या हरिणाचे प्रतीक मानले जाते. मंगळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मृगाशिरा नक्षत्राचा, कामाच्या वेग व स्थिरतेवर प्रभाव असतो असा समज आहे. धार्मिक समजुतींनुसार मृगाशिरा नक्षत्र विविध धार्मिक विधींसाठी शुभ मानले जाते. तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गिविंद देवगिरी यांच्या हवाल्याने टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, २२ जानेवारी रोजी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग मृगाशिरा नक्षत्रातच जुळत आहेत त्यामुळे राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यासाठी ही तिथी व मुहूर्त ठरवण्यात आला आहे.

हे ही वाचा<< अयोध्या राम मंदिरासाठी ४८ घंटा बनवणारी खरी कंपनी कोणती? Video मुळे चर्चेत आलेला प्रश्न सुटला, पाहा खरी बाजू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ जानेवारी ही तारीख १५ ऑगस्ट इतकीच खास, कारण..

दरम्यान, अलीकडेच श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपत राय यांनी २२ जानेवारी या दिवसाची तुलना १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनासह केली होती. चंपत राय ANI च्या अहवालात म्हणाले होते की, “२२ जानेवारी हा दिवस १५ ऑगस्ट इतकाच महत्त्वाचा आहे. कारगिल युद्धाप्रमाणे तसेच १९७१ च्या युद्धाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व सुद्धा मोठे आहे. देशभरातील लोकांमध्ये राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक सोहळ्याबाबत समाधानाची भावना दिसून येते. हे मंदिर भारताला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे. या लहानश्या शहरापुरता मर्यादित राम मंदिराचा आनंद आता देशाच्या अभिमानाचा, सन्मानाचा मुद्दा झाला आहे.”