९०च्या दशकामध्ये तमाम भारतीयांना भक्तीरसात आकंठ बुडवणारी मालिका ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला आहे. अद्याप भाजपाकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार, याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आगामी ५ राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण गोविल यांचा भाजपा प्रवेश झाल्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. नुकतेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला असून पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या प्रचारसभांमधून मिथुन चक्रवर्ती ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका करत आहेत.

 

सुमारे ३ दशकांपूर्वी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने भारतभरातल्या प्रेक्षकांवर गारूड केलं होतं. त्या काळातले टेलिव्हिजन क्षेत्रातले अनेक विक्रम या मालिकेने मोडले होते. विशेष म्हणजे या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे बाहेरच्या जगात वावरताना देखील त्यांना लोक रामच समजून त्यांच्या पाया पडत त्यांचा गौरव करायचे. याचे अनेक किस्से स्वत: अरुण गोविल यांनीच अनेकदा सांगितले आहेत.

अरुण गोविल यांचा पक्षप्रवेश झाला तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह उपस्थित होते. यावेळी अरुण गोविल म्हणाले, “मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे”, असं म्हणतानाच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. “पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची अॅलर्जी झाली. जय श्रीराम फक्त एक घोषणा नाही”, असं ते यावेळी म्हणाले.