Rambhadracharaya : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वक्तव्य सध्या गाजतं आहे. त्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली होती. ज्या पाठोपाठ आता महंत रामभद्राचार्य यांचंही वक्तव्य समोर आलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांना जे म्हणायचं आहे ते त्यांचं व्यक्तिगत म्हणणं असू शकेल ते काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत असं महंत रामभद्राचार्यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत काय म्हणाले होते?

प्रत्येक मशि‍दीखाली मंदिर असल्याचा दावा करून कसं चालणार? कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारहार्य नसल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं, त्यांच्या याचा विधानाचा दाखल देत शंकराचार्यांनी मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडलं. राजकीय सोयीनुसार त्यांनी विधानं केली असा आरोपही शंकराचार्य यांनी केला. त्यापाठोपाठ आता रामभद्राचार्यांनीही मोहन भागवत यांच्यावर टीका केली.

हे पण वाचा- Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”

काय म्हणाले महंत रामभद्राचार्य?

“ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत किंवा त्या आपण ताब्यात घेतल्याच पाहिजेत. साम-दाम-दंड-भेद कुठलाही मार्ग असो आपल्या आपल्या संस्कृतीचा वारसा ताब्यात घेतला पाहिजे. मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. ते कदाचित संघाच्या वतीने बोलले असतील कारण ते सरसंघचालक आहेत. पण मोहन भागवत हे काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. हिंदू धर्माची व्यवस्था ही हिंदू आचार्यांच्या हाती आहे. कुठल्याही एका संघटनेच्या प्रमुखांच्या हाती नाही.”

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती काय म्हणाले होते?

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोहन भागवत यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. मोहन भागवत राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, जेव्हा त्यांना सत्ता हवी होती तेव्हा ते मंदिरांबद्दल बोलत राहिले. आता सत्ता आल्यावर मंदिरं शोधू नका असा सल्ला ते देत आहेत, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात हिंदू सेवा महोत्सव आयोजित कऱण्यात आला होता. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले होते की अयोध्येत राम मंदिर व्हावं ही अनेकांची इच्छा होती. मंदिर त्या ठिकाणी झालंही. मात्र आता तिरस्कार किंवा शत्रुत्वासाठी नवे मुद्दे निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आपण जगाला हे दाखवून दिलं पाहिजे की आपण सगळे सहिष्णुतेने आणि सद्भावनेने राहात आहोत. गेल्या काही दिवसांपासून मशिदींच्या खाली मंदिरं आहेत असा दावा केला जातो आहे. उत्तर प्रदेशातल्या संभल या ठिकाणी मागील महिन्यात दंगल उसळली आणि चार लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नकोत असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. मात्र रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत हे हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत असं म्हटलं आहे.