बाबा रामदेव यांची घोषणा

पुढील पाच वर्षांत भारतात जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारण्यात येईल असे योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले. विविध शाखांत किमान एक लाख विद्यार्थ्यांना तेथे शिक्षण दिले जाणार आहे. या विद्यापीठासाठी १५०० एकर जागा घेण्यात आली आहे. प्रगत देशांच्या तोडीचे शिक्षण या विद्यापीठात दिले जाणार आहे असे रामदेव यांनी योग व आंतरिक शांती या विषयावरील कार्यक्रमात सांगितले. नवी दिल्ली नजीक हे विद्यापीठ उभारले जाणार असून ते ह्यूस्टन विद्यापीठाच्या दर्जाचे राहील. एकूण २५ हजार कोटी त्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. नालंदा, तक्षशिला यांसारख्या प्राचीन विद्यापीठांचा दर्जा त्याला मिळवून दिला जाईल. भारतात विद्यार्थी परदेशातून उच्च शिक्षणासाठी येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनुष्यबळ विकास मंत्रालयाला वेदिक शिक्षण मंडळ स्थापन करण्याची विनंती आपण केली असून गुरूकुल परंपरा सुरू करण्यास सांगितले आहे असे रामदेव म्हणाले. या विद्यापीठात आरोग्य, उद्योग व शिक्षण या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. पतंजली आयुर्वेद उत्पादनांचा सर्व नफा हा धर्मादाय कार्यासाठी खर्च केला जाईल, त्यातील ८० टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जाईल असे त्यांनी सांगितले.