नवी दिल्ली : ‘सत्यकथन, उत्तरदायित्व आणि वैचारिकता यांची बांधिलकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका लेक्चर’मध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडणार आहेत. नवी दिल्लीत निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान होईल. यंदा या व्याखानाचे यंदा सहावे वर्ष आहे.
‘सरकार आणि माध्यमस्वातंत्र्य यांच्यातील संवाद हा आत्मविश्वासपूर्ण राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे. ‘रामनाथ गोएंका यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या व्याख्यानात पंतप्रधानांची उपस्थिती याचेच उदाहरण आहे,’ असे ‘एक्स्प्रेस समूहाचे’ अध्यक्ष विवेक गोएंका यांनी म्हटले. ‘आजघडीला जगातील सत्तास्थानांची उलथापालथ होत आहे. अनेक राष्ट्रे आपली भूमिका आणि ध्येयधोरणे नव्याने मांडत आहेत. अस्थैर्य आणि अनिश्चितता हे कळीचे मुद्दे आहेत. अशा वेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांचे विचार ऐकण्याला विशेष महत्त्व आहे,’ असे ते म्हणाले.
परिस्थितीत बदल घडवण्याची क्षमता असलेल्या आणि वर्तमानातील आव्हानांवर भाष्य करून वैचारिक दिशा दाखवणाऱ्या वक्त्यांना ‘रामनाथ गोएंका लेक्चर सीरिज’मध्ये निमंत्रित करण्यात येते. या मालिकेच्या उद्घाटन पर्वात पाकिस्तानात दहशतवाद्यांकरवी मारले गेलेले ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या पत्नी मारिॲन पर्ल यांचे व्याखान झाले होते. त्यानंतरच्या व्याख्यानांत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताच्या स्थानाविषयी भविष्यदर्शी भूमिका मांडली होती; माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लोकशाहीतील माध्यम स्वातंत्र्याच्या ताकदीवर भाष्य केले होते. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेच्या नैतिक आणि संस्थात्मक तत्वांबाबत आग्रही मते मांडली होती तर, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीवर भारताची बदललेली धोरणे विशद केली होती. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी २०२३ मधील व्याख्यानात तंत्रज्ञानाने मानवी जीवनाला दिलेली नवी दिशा आणि सामाजिक बदलांना अधोरेखित केले होते.
