आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने बाकी आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आत्तापासूनच मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, हरियाणाच्या कैथलमध्ये काँग्रेसच्या एका सभेत बोलताना काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी व्यासपीठावरून भाजपा आणि जननायक जनता पार्टीवर हल्लाबोल केला. सुरजेवाला म्हणाले, जे लोक भाजपा आणि जजपाला मत देतात ते राक्षसी प्रवृत्तीचे आहेत.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, अरे राक्षसांनो! भाजपा-जजपावाल्यांनो तुम्ही सगळे राक्षस आहात. जे लोक भारतीय जनता पार्टीला मत देतात, तसेच भाजपाचे समर्थक हे राक्षस आहेत, हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. मी आज महाभारताच्या या भूमीवरून तुम्हा सगळ्यांना शाप देतो.

यावेळी काँग्रेसचे आमदार किरण चौधरी म्हणाले, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या ताटातील भाकरी हिसकावून घेण्याचं काम भाजपा-जजपा सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही. निवडणुकीच्या आधी यांनी (भाजपा) खर्चाच्या दुप्पट परतावा देण्याची घोषणा केली होती. परंतु, तसं काही झालं नाही. महागाईमुळे गृहिणी हैराण झाल्या आहेत.

हे ही वाचा >> हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, सोलानमध्ये ७ बळी

दरम्यान, काँग्रेसच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा आयटी सेलचे अमित मालविय यांनी सुरजेवाला यांच्या भाषणाचा काही भाग ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधींचे निकटवर्तीय सुरजेवाला हे भाजपाला मत देणाऱ्यांना राक्षस म्हणत आहेत आणि शाप पण देत आहेत. काँग्रेसने त्यांच्या या वरिष्ठांच्या मानसिक स्थितीमुळे लोकांचा जनाधार गमावला आहे. जनतेच्या दरबारात यांना अजून अपमानित व्हायचं आहे.