scorecardresearch

…अन् बलात्कार प्रकरणातील आरोपी निघाला नपुंसक; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?

एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नपुंसक असल्याचं उघडकीस आलं आहे.

rape case
प्रातिनिधीक फोटो

गुजरातमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नपुंसक असल्याचं उघडकीस आलं आहे. पीडित तरुणीनं गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. अटक केल्यानंतर आरोपीनं जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

त्यानंतर आरोपीनं गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण नपुंसक असून पीडितेवर बलात्कार केला नाही, त्यामुळे आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी आरोपीनं उच्च न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी व्यक्तीची तीनवेळा नपुंसकत्वाची चाचणी करण्यात आली. या तिन्ही चाचणीत आरोपी नपुंसक असल्याचं सिद्ध झालं. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून ५५ वर्षीय आरोपीला जामीन मंजूर केला.

नेमकं प्रकरण काय आहे?

नोव्हेंबर २०२२ मध्ये गुजरातमधील एका २७ वर्षीय तरुणीने ५५ वर्षीय व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला. आरोपीनं मॉडेलिंगमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटकही केलं. पण आरोपीनं “मी नपुंसक असून बलात्कार केला नाही” असं म्हणत जामिनासाठी अर्ज केला. गुजरात उच्च न्यायालयाने नपुंसकत्वाची चाचणी केली. तीनवेळा चाचणी केल्यानंतर आरोपी तिन्ही वेळा नपुंसक असल्याचं सिद्ध झालं. यानंतर न्यायाधीश समीर दवे यांच्या खंडपीठाने आरोपीला जामीन मंजूर केला.

हेही वाचा- मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

‘लाइव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी व्यक्ती एक फोटोग्राफर आहे. त्याने पीडितेला मॉडेलिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार आणि धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पण पीडित तरुणी आरोपीकडे पैसे मागत होती, पैसे न मिळाल्याने तिने खोटा गुन्हा दाखल केला, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या