एअर इंडिया टाटांकडे

 ‘एअर इंडिया’च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली.

६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण, १८ हजार कोटींची बोली
सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी अखेर ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरीदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या.

‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. त्यांनी ती सरकारला विकली होती, पण आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे. ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावल्याचे शुक्रवारी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.

 ‘एअर इंडिया’च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली. उर्वरित २,७०० कोटी रुपये टाटा सरकारला रोख स्वरूपात देणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांड्ये यांनी दिली. ‘टाटा सन्स’ व्यतिरिक्त ‘स्पाइस जेट’चे अध्यक्ष अजय सिंह यांची दुसरी व्यक्तिगत बोली होती.

 प्रक्रियेनुसार चार महिन्यानंतर ही कंपनी ‘टाटा सन्स’कडे हस्तांतरित होईल. पहिल्या वर्षी सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवले जाईल आणि दुसऱ्या वर्षापासून स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू होईल. आताच्या व्यवहारामुळे ‘महाराजा’ची (एअर इंडिया) शान आता पुन्हा वाढणार आहे. टाटा समूहाचा सध्या  ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे.

मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया जुलै २०१७ मध्ये सुरू झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सात कंपन्यांनी सरकारकडे ही कंपनी खरेदी करण्याबाबत प्रयत्न केले होते, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन खात्याने म्हटले आहे. खात्याचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की, टाटा सन्सच्या एसपीव्हीने एअर इंडिया कंपनी खरेदी केली आहे. टाटा सन्सने १८ हजार कोटींची बोली लावली असून त्यातील १५,३०० कोटी रुपये कर्जात जाणार आहेत आणि उर्वरित रक्कम सरकारला रोख स्वरूपात दिली जाणार आहे.

डिसेंबरमध्ये नियोजन केल्याप्रमाणे ‘टाटा सन्स’ने या व्यवहारात जास्त बोली लावली होती. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, व्यापारमंत्री पीयूष गोयल आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एअर इंडियाच्या व्यवहारास ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये २००७ मध्ये विलीनीकरणानंतर ‘एअर इंडिया’चा तोटा वाढला होता. आता ‘टाटा सन्स’ला देशांतर्गत ४४०० आणि आंतरराष्ट्रीय १८०० उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे. परदेशात पार्किंगचे ९०० स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला १०० टक्के तसेच ५० टक्के वाटा मिळणार आहे.

मालकीचा प्रवास

’जहाँगीर रतनजी दादाभॉय म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची

स्थापना केली.

’१७ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले. या विमानाचे वैमानिक होते, जे. आर. डी. टाटा!

’१९४६मध्ये ‘टाटा सन्स’ने त्याचे विभाजन करून १९४८ मध्ये एअर इंडिया आणि युरोपातील उड्डाणांसाठी एअर इंडिया इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या स्थापन केल्या.

’ही खासगी-सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती. त्यात टाटांचा वाटा २५ टक्के होता तर सरकारचा वाटा ४९ टक्के होता, उर्वरित वाटा नागरिकांचा होता. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

’करोना साथीमुळे जानेवारी २०२० मध्ये एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेस विलंब होत होता. या वर्षी पुन्हा एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली.  टाटा समूहाने डिसेंबर २०२० मध्येच ही कंपनी खरेदी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आता तो पूर्ण झाला.

कंपनीच्या पुनर्बांधणीस काही काळ द्यावा लागेल. आता टाटा समूहाचा हवाई बाजारपेठेतील सहभाग वाढणार आहे. जेआरडींच्या नेतृत्वाखाली एकेकाळी या कंपनीने नाव कमावले होते. त्या काळात ती प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनी होती. आज जेआरडी असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. – रतन टाटा 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ratan tata indian industrialist tata sons air india tata air india is an airline akp

Next Story
चीन आणि भारत यांच्यात तवांगमध्ये चकमक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी