मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही, याची आम्हाला स्पष्ट कल्पना आहे. मात्र, याचा अर्थ सरकार त्यांचा छळ करते असा होत नाही, असे वक्तव्य केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रविशंकर प्रसाद यांना सरकारचे सध्याचे धोरण देशातील सर्व समाजांना सामावून घेणारे आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, भारतातील विविधततेचा मी आदर करतो. याकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत आणि मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगू इच्छितो. बऱ्याच काळापासून आमच्याविरुद्ध मोहीम चालवण्यात येत आहे. मात्र, जनतेच्या कृपेने आम्ही सध्या सत्तेत आहोत. सध्याच्या घडीला १५ राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून १३ ठिकाणी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. एकूणच देशभरात आमचे राज्य आहे. मात्र, आम्ही उद्योग किंवा सेवाक्षेत्रातील मुस्लिमांना कधी त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना एखाद्या पदावरून दूर केले आहे का? आमच्या पक्षाला मुस्लिम मतं मिळत नाहीत, ही बाब मी जाहिरपणे मान्य करतो. मात्र, तरीदेखील आम्ही त्यांना स्वीकारले आहे की नाही?, असा प्रतिसवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी रविशंकर प्रसाद यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अन्वर-उल-हक यांचा दाखला दिला. यावरून तुम्हाला आम्ही कशाप्रकारे सरकार चालवतो याची कल्पना येईल, असे प्रसाद यांनी म्हटले. यापूर्वी पंतप्रधानांची पद्म पुरस्कारांबाबतची भूमिका साचेबद्ध असायची. अनेकजणांना याचा फायदा मिळायचा. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी हे वातावरण बदलायचे ठरवले. त्यामुळेच त्यांनी पद्मश्री पुरस्कारासाठी जलपायगुडीतील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या एका मजुराची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अन्वर-उल-हक आमच्या पक्षाला मतदान करतात किंवा नाही, याचा विचार न करता आम्ही हा निर्णय घेतला. आमच्या पक्षातूनही विनाकारण किंवा बेजबाबदार वक्तव्ये झाल्यास त्याविषयीही पंतप्रधान चिंता व्यक्त करतात, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shankar prasad we do not get muslim votes but have we given them sanctity or not
First published on: 22-04-2017 at 08:45 IST