खुलं पत्र : “मोदीजी, रोजगार मागणाऱ्यांच्या हाती तुम्हीच मंदिराच्या वर्गणीचं पावती पुस्तक द्या”

पंतप्रधान मोदींना लिहिलेलं खुलं पत्र चर्चेत

प्रातिनिधिक फोटो (फोटो ट्विटर आणि पीटीआय़वरुन साभार)

सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. यामध्ये रविश कुमार यांनी रोजगार म्हणून पंतप्रधान मोदींनी तरुणांच्या हाती राम मंदिरासाठी सुरु असणाऱ्या वर्गणी गोळा करण्याच्या मोहिमेचं पावती पुस्तक तरी द्यावं अशी मागणी केली आहे. बेरोजगार तरुण काहीही झालं तरी तुम्हालाच मतदान करता त्यामुळे तुम्ही किमान त्यांना हे वर्गणी गोळा करण्याचं पुण्याचं काम तरी द्यावं, असा खोचक टोला रवीश यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> ‘मोदी रोजगार दो’ Top Trend! ‘मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या’, म्हणणारे ६ लाख ७४ हजारांहून Tweets

“मी टूलकिटमुळे त्रासलेलो आहे. बेरोजगार लोकं आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी जे टूलकिट बनवतात त्यामध्ये ते माझा फोन नंबर टाकतात. आपल्या सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती ही ते त्यामध्ये देतात. एक असा देश जिथे खरी पत्रकारिता संपली आहे तिथे एखाद्या पत्रकारावर एवढं ओझं टाकणं चुकीचं आहे. मी भारताच्या तरुणांना या पूर्वीच सांगितलं आहे की तुमचे ना कोणते तारुण्य राहिले आणि ना कथा. तरी मला रोज हजारो तरुणांचे मेसेज येतात. मी म्हणजेच रवीश कुमार त्यांच्या बेरोजगारीचे कारण नाही हे ठाऊक असतानाही ते मला मेसेज पाठवतात. मी तुमच्या मंत्रीमंडळामधील रोजगारमंत्री नाहीय. मी तुमच्या पक्षाच्या आयटी सेलचा प्रमुखही नाहीय. या अशा बेरोजगार तरुणांबद्दल सतत लिहिल्याने देशाची प्रतिमा मलीन होते.  भारतामध्ये मंदिर बनवण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचं काम असतानाही मुलं नोकऱ्या मागत आहेत यावरुन जग आपल्यावर हसत आहे. भारताची बदनामी व्हावी असं मला वाटतं नाही,” असं रवीश यांनी या पोस्टच्या पहिल्या परिच्छेदामध्ये म्हटलं आहे.

पुढे बोलताना रविश यांनी, “तुम्ही बेरोजगारांना नोकरी द्यावी या मागणीसाठी मी पत्र लिहीत नाहीय. तुम्ही त्यांना नोकऱ्या दिल्या नाही तरी ते तुम्हालाच मतं देतील. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आंदोलन करणाऱ्या तरुणांचं सर्वेक्षण करुन पाहा. रोजगार हा काही मुद्दा नाहीय मला ठाऊक आहे. राजकारणामध्ये धर्माचे सर्वात मोठे योगदान हेच आहे की तो राजकारण संपवतो. न्याय हा धर्माचा आधार अशतो. मात्र राजकारणामध्ये धर्माचा आधार अन्याय करणं आणि त्यावर पडदा टाकणं हा असतो. या तरुणांना रोजगाराहूनही अधिक काही महत्वाचं हवं आहे तर ते म्हणजे धर्माचा गौरव. धर्माची ओळख हवी. बंगालमध्ये तुम्ही जय श्री रामच्या घोषणा देण्याच्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहात. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तर हे काम त्याहूनही सोप्प आहे. तुम्ही यूपी, बिहारच्या तरुणांच्या हाती मंदिर बनवण्यासाठी गोळा करण्यात येणाऱ्या वर्गणीची पावती पुस्तक द्या. जिथे जिथे हे तरुण आंदोलन करत आहेत तिथे तिथे जाऊन त्यांच्या हातात हे पावती पुस्तक द्या. त्यानंतर तुम्ही पाहा किती आनंदाने हे तरुण या कामाला लागतील. त्यांचे संपूर्ण कुटुंबच या कामामध्ये स्वत:ला वाहून घेईल. जर या एवढ्याश्या गोष्टीने भारतामधील बेरोजगारी कमी होणार असेल तर ती करण्यासाठी एवढा वेळ का लावत आहात. तरुण गल्ल्यागल्ल्यांमध्ये अभिमानाने फिरु लागतील. वर्गणी न देणाऱ्यांना धडा शिकवतील. राष्ट्र निर्माणाच्या कार्यातून या तरुणांना दूर का ठेवण्यात यावं? तरुणांना परिक्षांच्या तारखांबद्दल माहिती नकोय. वर्गणी किती गोळा झाली हे त्यांचे लक्ष्य असावे. तुम्ही पावती पुस्तकं देऊन टाकं,” असं म्हटलं आहे.

शेवटच्या परिच्छेदामध्ये, रवीश यांनी, “प्रो अकबर पत्रानंतर माझं हे दुसरं प्रो-मोदी पत्र आहे. गोदी मीडियामधील मोठ्या मोठ्या अँकर्सला अशी कल्पना नाही सुचना. त्यांना केवळ टाळ वाजवता येतात. फक्त या बेरोजगारांना सांगा की मला त्रास देण्यासाठी टूलकिट बनवू नका. या बेरोजगारांनी दिशा रविचं नावही ऐकलं नाहीय किंवा तिच्याबरोबर झालं ते चुकीचं झाल्याचं बोलण्याची हिंमतही दाखवली नाहीय. अनेकदा हे मला चुकीचं ठरवतात मात्र यामध्येही तुमचं पारडं जड आहे. ते तुम्ही कायम बरोबरच कसे हे सिद्ध करुन दाखवतात. अशा तरुणांना तुम्ही वर्गणी पुस्तक नाही देणार तर कोण देणार?,” असा प्रश्न विचारला आहे. तसेच “मला रोज हजारो मेसेज डिलिट करावे लागतात. मी थकलोय. तुम्ही पाहिलच असेल की माझे केस गळू लागलेत. मी पातळही झालोय. एवढा योगा केला. सातही दिवस काम केलं. कधीच झोपलो नाही तरी माझी ही परिस्थिती आहे. तुम्ही कृपा करुन या तरुणांना संभाळा,” अशी विनंती रवीश यांनी मोदींकडे केलीय.

तसेच या पोस्टखाली रविश कुमार यांनी एक सूचनाही लिहिली आहे. “भारताच्या पराक्रमी तरुणांनो, तुम्ही रोजगारासाठी धरणे आंदोलन करु नका. तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर काय झालं. तुम्हाला अद्याप वर्गणी गोळा करण्याचं पुण्याचं काम करण्याची संधी का मिळाली नाही याबद्दल तुमचा आक्षेप हवा. मला मेसेज करु नका. तुमचे तारुण्य आणि कथा दोन्ही संपवण्यात आलं आहे,” असा टोला रवीश यांनी लगावला आहे.

रवीश यांची ही पोस्ट चार हजारांहून अधिक जणांनी शेअर केली आहे. तर ४० हजारांहून अधिक जणांनी ती लाईक केली आहे. या पोस्टवर तीन हजार ७०० हून अधिक जणांनी कमेंट केल्यात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ravish kumar open letter to pm modi about unemployment scsg