पक्षाकडून सांगण्यात आल्यास लोकसभा निवडणूकीत वाराणसीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींविरोधात लढण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय म्हणतात, वाराणसीतून निवडणूक लढविण्याची माझीही इच्छा आहे परंतु, प्रथम पक्षाने मला तेथून उमेदवारी जाहीर केली पाहिजे. पक्षाने सांगितल्यास मोदींविरोधात निवडणूक लढविण्यास केव्हाही तयार असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांना उमेदवारी मिळण्याची अटकळ सुरू असल्याची चर्चा आहे. मोदींविरोधात मजबूत नेता उभारण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत, तर आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही मोदींविरोधात वाराणसीतून लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वाराणसी मतदार संघात यावेळी मोदी-केजरीवाल-दिग्विजय असे तिरंगी घमासान होण्याची दाट शक्यता आहे.