आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत चौकशी करण्यास परवानगी देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आसाराम बापूंच्या साबरमतीमधील आश्रमात २००८ साली दीपेश आणि अभिषेक या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी आसाराम बापूंची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. न्या. पी. सदाशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मुलांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेली याचिका फेटाळली. या प्रकरणातील सर्व पुरावे तपासले असता सीबीआय चौकशीची कोणतीही आवश्यकता नाही. मात्र या प्रकरणी नवे पुरावे समोर आल्यास कनिष्ठ न्यायालयात याची चौकशी करता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयानेही सीबीआय चौकशीस नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मृत मुलांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणात आश्रमातील अनेक उच्च पदस्थ व्यक्ती गुंतलेल्या असून याची गुजरातमध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. मात्र न्या. सदाशिवम यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळत गुजरात उच्च न्यायालयाचा यापूर्वीचा निर्णय कायम ठेवला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realif for asaram bapu
First published on: 10-11-2012 at 04:51 IST