दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ १० नोव्हेंबरला i20 कारचा स्फोट झाला. या स्फोटात १३ जण ठार झाले तर २५ हून अधिक जण जखमी झाले. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ज्या i20 कारचा स्फोट झाला ती कार उमर नबी हा दहशतवादीच चालवत होता अशी माहिती आता समोर आली आहे. तपास यंत्रणांनी फॉरेन्सिक चाचणीच्या आधारे ही माहिती दिली आहे. जो स्फोट झाला त्या स्फोटात कार जवळपास पूर्ण नष्ट झाली. त्यानंतर तपास यंत्रणांना एक पाय सापडला आणि काळा बूट सापडला. त्याची फॉरेन्सिक चाचणी झाल्यानंतर ही कार उमर नबीच चालवत होता याची पुष्टी करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांना एक बूटही सापडला आहे
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार उमर नबीचा जो पाय मिळाला त्याचा डीएनए त्याच्या आईशी जुळवून पाहण्यात आला जो जुळतो आहे ही माहितीही देण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. तसंच तपास यंत्रणांना एक बूटही मिळाला आहे. उमरच्या फूटवेअरशी हा बूट जुळून येतो आहे अशीही माहिती मसोर आली आहे. तसंच उमरचं काही ठिकाणांचं फुटेजही समोर आलं आहे. उमरच कार चालवत होता. त्याच्या पायाचा भाग कारमधून चालकाच्या बाजूने बाहेर पडला.
उमर नबीनेच घडवून आणला स्फोट
दिल्लीत स्फोट झालेली कार हा उमर यू नबी चालवत होता, त्यानेच स्फोट घडवून आणला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर दोन डॉक्टरांनी या कटात सक्रिय मदत करण्याची भूमिका पार पाडली, त्यापैकी एकाने लॉजिस्टिक आणि भरतीमध्ये, तर दुसऱ्याने स्टोरेज आणि पायाभूत सुविधा पुरवण्यात मदत केली. ज्या गाडीचा लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झाला ती चालवत असलेला डॉ. उमर यू नबी याने अन्य दोन व्यक्तींबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. उमर याने मुझफर अहमद राथेर (कदाचित डॉक्टर) आणि डॉक्टर मुझम्मिल शाकील यांच्याबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. हे तिघे मार्च २०२२ रोजी तुर्कियेला गेले होते, आणि दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ हे तेथे राहिले होते. येथे ते कथितपणे १४ जणांना भेटले. या सर्वांची ओळख तपसाली जात आहे, या १४ जणांपैकी एकजण हा उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे अटक केलेल्या एका व्यक्तीचा भाऊ असल्याचे सांगितले जाते.
