संरक्षण उत्पादन क्षेत्रात येत्या काही महिन्यातच सुधारणा राबवल्या जातील, असे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही गोव्यात सत्ता हाती घेतली त्याच्या आधी गोव्यातील औद्योगिक वातावरण नकारात्मक होते, कारण लोकांना अनेक अधिकाऱ्यांकडे खेटे मारावे लागत असत. संरक्षण उत्पादन क्षेत्रातही आपली मानसिकता तशीच आहे. हे मुद्दे आपण अग्रस्थानी आणले आहेत व येत्या काही महिन्यात संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सुधारणा सुरू केल्या जातील. सध्याच्या अनेक नियंत्रणांमुळे सीमेवरील रस्त्यांची कामे रखडली आहेत. देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असून संरक्षण प्रकल्पांसाठी योग्य कायद्यांची आवश्यकता आहे. गोव्यात हेलिकॉप्टर उत्पादन सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही पण त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा राज्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.