पीटीआय, गोंडा : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी शनिवारी राजीनाम्यास नकार दिला. राजीनामा दिल्यास मला आरोप मान्य आहेत, असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.      

भारतीय कुस्तीगिरांनी दुसऱ्यांदा आंदोलन पुकारल्यानंतर पाच दिवसांनी ब्रिजभूषण यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण पूर्णपणे निर्दोष आहोत. आपण काहीच केलेले नाही. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत, असे ब्रिजभूषण म्हणाले. ब्रिजभूषण यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाबाबतही आपली भूमिका मांडली. ब्रिजभूषण म्हणाले,‘‘कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्षपद माझ्यासाठी मोठे नाही. यापूर्वीच आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. मात्र काहीही झाले तरी राजीनामा देणार नाही. राजीनामा देणे म्हणजे मला आरोप मान्य असल्यासारखे होईल आणि दुसरे म्हणजे गुन्हेगार म्हणून मला राजीनामा द्यायचा नाही.’’

कुस्तीगिरांच्या आंदोलनाला शनिवारी सकाळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वडेरा यांनी उपस्थिती लावून कुस्तीगिरांची चौकशी केली. त्या अनुषंगाने ब्रिजभूषण यांनी, या सर्व प्रकारामागे कोण आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘‘सुरुवातीपासूनच मी या मागे उद्योजक आणि काँग्रेसचा हात असल्याचे सांगत आहे. अर्थात, मला त्याची चिंता नाही,’’ असेही ते म्हणाले. महिला कुस्तीगिरांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या तरी अद्याप धरणे आंदोलन का सुर आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘‘माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती. तो आता दाखल झाला आहे. तरी आंदोलन सुरू कसे? आंदोलन, निषेध वगैरे सगळे काही हे खेळाडूंसाठी चाललेले नाही, हे सर्व षडय़ंत्र रचणाऱ्यांसाठी चालले आहे,’’ असा आरोपही ब्रिजभूषण यांनी केला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश आणि हरियाणा असा हा वाद

मुळीच नाही. दोन्ही राज्यांतील सर्व आखाडे माझ्या बाजूने आहेत. केवळ या आखाडय़ांमधील एक कुटुंब माझ्या विरोधात आहे. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मला अडचणीत आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. मी निर्दोष आहे हे लवकरच सिद्ध होईल.

– ब्रिजभूषण शरण सिंह