वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताने रविवारी सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक पूर्ववत सुरू केली. करोना साथीमुळे महत्त्वाच्या बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय विमानवाहतुकीस भारताने दोन वर्षांपासून बंदी घातली होती. ‘या निर्णयाने जगाशी भारत जोडला जाईल,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

येत्या उन्हाळय़ात एक हजार ७८३ परदेशी विमानांची साप्ताहिक उड्डाणे होतील तर एक हजार ४६६ भारतीय विमाने दर आठवडय़ाला परदेशी जातील.

नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा भारतीय विमाने आणि ६३ देशांतील ६० परदेशी विमाने आज, रविवारपासून भारताला जगाशी जोडतील. आघाडीची इंडिगो कंपनी दर आठवडय़ाला ५०५ विमानांची वाहतूक करेल. टाटा उद्योगसमूहाची एअर इंडिया ३६१ तर उपकंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस ३४० विमानांची दर आठवडय़ाला वाहतूक करेल. विमान वाहतूक क्षेत्रातील उन्हाळी हंगाम २७ मार्च ते २९ ऑक्टोबरदरम्यान गणला जातो.

करोना महासाथ सुरू होण्याआधी दर आठवडय़ाला चार हजार ७०० आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होत असत. काल, शनिवापर्यंत भारतातून आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक ३७ देशांना ‘एअर बबल’ पालन करून होत होती. मागील आठवडय़ात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अद्ययावत नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार विमानातील कर्मचारी पथकाला ‘पीपीई किट’ घालण्याची गरज नव्हती. तसेच विमानात तीन जागा तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रिक्त ठेवण्याचा नियमही रद्द करण्यात आला होता. परंतु मुखपट्टी आणि शारीरिक अंतर राखणे अनिवार्यच होते. विमान कंपन्यांनी विमानाअतिरिक्त पीपीई किट, एन ९५ मुखपट्टय़ा ठेवणेही अनिवार्य केले होते. कोविडचा प्रादुर्भाव सौम्य झाल्याने २७ मार्चपासून परदेशी विमानवाहतूक पूर्ववत सुरू होईल, अशी घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ८ मार्चला केली होती. 

करोना नियम पाळावेच लागणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च २० पासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. काही आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक संबंधित देशांच्या संमतीने व ‘एअर बबल’ निकषांचे पालन (ठरावीक निकषात बसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासास मुभा होती) करून सुरू होती. त्यात इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया, पोलंड, म्यानमार, तुर्कस्थान, येमेन आणि इजिप्तचा समावेश होता. आता या सर्व विमान वाहतुकीचे ‘एअर बबल’ हटविले तरी आरोग्य मंत्रालयाच्या करोना प्रतिबंधक नियमांचे त्यांना पालन करावेच लागेल.