सभागृहात दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्याबद्दल गेल्या वर्षी टीकेच्या धनी ठरलेल्या ‘खूबसुरत’ रेखा यांनी बुधवारी प्रथमच संसदेच्या चालू अधिवेशनात सभागृहात हजेरी लावली. फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या रेखा यांनी सभागृहात शून्य प्रहराला हजेरी लावली. मात्र केवळ १० मिनिटेच त्या सभागृहात होत्या. रेखा यांना ९९ क्रमांकाचे आसन देण्यात आले असून त्यांनी बुधवारी त्यांच्या शेजारच्या आसनावर बसणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां अनू आगा, एन. के. गांगुली आणि एच. के. दुआ यांच्याशी बातचीत केली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावण्याची रेखा यांची पहिलीच वेळ होती. यापूर्वी त्यांनी हिवाळी अधिवेशनात आणि त्याआधी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावली होती. राज्यसभेवर २०१२ मध्ये नियुक्ती झाल्यापासून रेखा यांनी आतापर्यंत एकूण १० वेळा सभागृहात हजेरी लावली आहे.
रेखा दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्याबद्दल सभागृहातील अन्य सदस्यांनी त्यांच्यावर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर जोरदार टीका केली होती. अनुपस्थित राहण्याची परवानगी या सदस्यांनी घेतली होती का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला होता. गैरहजर राहून सेलिब्रिटी सभागृहाचा अवमान करीत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.