राज्यसभेवर नियुक्ती झाल्यापासून सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचा शिक्का बसलेल्या अभिनेत्री रेखा यांनी मंगळवारी राज्यसभेत उपस्थिती लावली. संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच रेखा राज्यसभेच्या कामकाजामध्ये सहभागी झाल्या.
सोनेरी रंगाची सिल्कची साडी परिधान केलेल्या रेखा सामाजिक कार्यकर्त्या अनू आगा यांच्याशेजारी बसल्या होत्या. दोघींनी यावेळी एकमेकींशी चर्चा केली. सभागृहाचे कामकाज भोजनासाठी तहकूब होण्याआधी रेखा आणि आगा या दोघीही सभागृहातून बाहेर जाताना दिसल्या.
रेखा आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे दोघेही राज्यसभेच्या कामकाजात दीर्घकाळ सहभागी झालेले नसल्याबद्दल गेल्या आठवड्यातच विविध सदस्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
सचिन तेंडुलकर ४० दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालेला नाही तर रेखा त्यापेक्षा कमी दिवस कामकाजात सहभागी झालेली नसल्याचे राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरिअन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.
सचिन तेंडुलकरची एप्रिल २०१२ मध्ये राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून तो तीनवेळा सभागृहात आला आहे. तर रेखाची नियुक्तीही एप्रिल २०१२ मध्येच झाली असून, ती आत्तापर्यंत सात वेळा सभागृहात आली आहे, असेही त्यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha makes appearance in rajya sabha
First published on: 12-08-2014 at 03:13 IST