४ जी इंटरनेट सेवा क्षेत्रात खळबळ माजवल्यावर आता रिलायन्स जिओ लवकरच ५ जी इंटरनेट सेवा क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. रिलायन्स जिओकडून लवकरच ५ जी इंटरनेट सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये याबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रिलायन्स जिओने मोबाईल निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या सॅमसंगसोबत ५ जी सेवेसाठी करार केला आहे. वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओ आणि सॅमसंगसोबत नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत रिलायन्स जिओ आणि सॅमसंगकडून ५ जी सेवेचा शुभारंभ केला जाऊ शकतो.
बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओ आणि सॅमसंगमध्ये पहिल्यांदाच एकत्र पत्रकार परिषद घेतली. ‘बाजारातील स्पर्धक, सरकार, समुदाय यांच्यामधील सहकार्य वाढावे,’ असे यावेळी रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने म्हटले. जिओच्या ४ जी क्षेत्रातील यशाचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. जिओच्या ४ जी सेवेमुळे आतापर्यंत १३ कोटी भारतीयांचे दैनंदिन आयुष्य बदलल्याचे यावेळी रिलायन्सकडून सांगण्यात आले.
नव्या प्रकल्पाच्या मदतीने देशभरातील ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट रिलायन्स जिओने ठेवले आहे. देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याचा आणि देशात ४ जी सेवेसोबतच ५ जी सेवा आणून डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचा मानस रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने व्यक्त केला आहे.
५ जी सेवेमुळे अनेक किलोमीटर अंतरापर्यंत वाय-फाय सेवेचा वापर करता येणे शक्य होईल, असे दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. ५ जी सेवेचा वेग १ जीबी प्रति सेकंद इतका असण्याची शक्यता आहे. यामुळे एचडी चित्रपट काही सेकंदांमध्ये डाऊनलोड करता येणे शक्य होणार आहे. ५ जी सेवेमुळे टिव्ही केबलची आवश्यकता भासणार नाही. यासोबतच अधिकाधिक काम वायरलेस पद्धतीने होऊ शकणार आहे.
रिलायन्स जिओेची सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या १७० दिवसांमध्ये कंपनीने १० कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला. सध्या मोफत असणारी इंटरनेट सेवा १ एप्रिलपासून सशुल्क होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच रिलायन्स उद्योगाकडून करण्यात आली. यानंतर रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागांची किंमतदेखील वाढली आहे. गेल्या ७ वर्षांमधील उच्चांकी दर रिलायन्सने गेल्या काही दिवसांमध्ये गाठला आहे.