पीटीआय, नवी दिल्ली
धर्माच्या आधारावरील देशाची फाळणी हा इतिहासातील एक काळा अध्याय असून, अनेक जण अजूनही १९४७च्या दहशतीचा आघात सोसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोमवारी सांगितले.देशाला फाळणीची जबर किंमत मोजावी लागली, असे फाळणीदरम्यान जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना शहा यांनी सांगितले.
‘‘धर्माच्या आधारावरील देशाची फाळणी हा इतिहासातील एक काळा अध्याय आहे. त्यामुळे उद्भवलेल्या विद्वेषामुळे लाखो लोक मारले गेले आणि कोटय़वधी लोक विस्थापित झाले. देशाला याची जबर किंमत मोजावी लागली आणि त्या भयावह अनुभवाचा आघात अनेक लोक अद्याप सोसत आहेत. फाळणीमुळे ज्यांनी जीव गमावले अशा लोकांबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मी आजच्या फाळणी बिभीषिका दिवसानिमित्त संवेदना व्यक्त करतो,’’ असे शहा यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले.
देशाच्या फाळणीत ज्यांनी जीव गमावले, त्यांचे स्मरण करण्यासाठी मोदी सरकार २०२१ सालापासून १४ ऑगस्ट हा फाळणी बिभीषिका दिवसानिमित्त (पार्टिशन हॉरर रिमेम्बरन्स डे) म्हणून पाळते.