“केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन चुकीचं”; ‘जोधा-अकबर’चं उदाहरण देत अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी!

धर्म परिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते, असं देखील म्हटलं आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

उत्तरप्रदेशमध्ये लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या दरम्यान आता या संपूर्ण घटनाक्रमांमध्ये अकबर आणि जोधाबाई यांच्या किस्स्याची देखील इंट्री झाली आहे. तर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन केलं जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

एका प्रकरणाच्या सुनावणी वेळी अलहाबाद उच्च न्यायालयाने मुघल बादशाह अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण देत, धर्म परिवर्तनापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. न्यायलायने टिप्पणी केली की अकबर-जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून धर्म परिवर्तनाच्या अनावाश्यक घटनांपासून वाचलं जाऊ शकतं.

या टिप्पणीमध्ये उल्लेख करण्यात आला की अकबर-जोधाबाईने धर्म परिवर्तन न करता विवाह केला. एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. न्यायालयाने सांगितले की धर्म आस्थेचा विषय आहे, हा आपली जीवनशैली दर्शवतो. ईश्वराप्रती भाव प्रकट करण्यासाठी एखादी विशिष्ट पूजा पद्धतच असणे गरजेचे नाही. विवाह करण्यासाठी समान धर्माचं असणं देखील आवश्यक नाही. अशावेळी केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन करणं पूर्णपणे चुकीचं आहे.

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे देखील नमूद केले की, अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनात धर्माबद्दल विशेष आस्था नसते. हा निर्णय केवळ दबाव, भीती व लालसेपोटी घेतला जातो. केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन चुकीचं आहे, याला काही घटनात्मक मान्यता नसते. तसेच, न्यायालयाने हे देखील सांगितले की, वैयक्तिक फायद्यासाठी केले गेलेले धर्म परिवर्तन, केवळ वैयक्तिक नुकसानच करत नाही तर, ते देश व समाजासाठी देखील घातक असते. अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते आणि विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Religion conversion is wrong just for marriage allahabad high courts comment giving the example of jodha akbar msr