पीटीआय, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल गेनी याने या वर्षी जानेवारी महिन्यात लाल किल्ल्याच्या भोवती अनेकदा रेकी केल्याचे तपासात उघड झाले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की हा प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा डाव असण्याची शक्यता आहे. मात्र, त्या वेळी मोठा बंदोबस्त आणि सुरक्षा दलांच्या दक्षतेमुळे तो डाव उधळण्यात आला.
तपासादरम्यान आढळले, दिल्ली स्फोटामधील ‘आय-20’ कार चालवीत असलेला संशयित डॉ. उमर आणि डॉ. मुजम्मिल तुर्कीला जाऊन आले होते. त्यांच्या पारपत्रावर तुर्कीच्या स्थलांतरित विभागाचा शिक्का आहे. त्यांच्या या प्रवासात हे दोघे इतर कुठल्या परकी नागरिकाला भेटले का, याचा तपास सुरू आहे.
पंतप्रधानांकडून जखमींची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘एलएनजेपी’ रुग्णालयामध्ये जाऊन दिल्ली स्फोटामध्ये जखमी झालेल्यांची विचारपूस केली. दोषींना शासन केल्याशिवाय राहणार नाही, याचा त्यांनी या वेळी पुनरुच्चार केला.
अमोनिअम नायट्रेटचा वापर?
फॉरेन्सिक विभागाने स्फोटाच्या ठिकाणाहून ४० नमुने गोळा केले आहेत. यामध्ये दोन काडतुसे, दारुगोळा, दोन प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे. या नमुन्यांच्या प्राथमिक विश्लेषणानंतर स्फोटामधील एक रसायन अमोनियम नायट्रेट आणि दुसरे त्याहून अधिक शक्तिशाली स्फोटक असण्याची शक्यता आहे, असे या विभागाने सांगितले.
कार विक्रेता ताब्यात
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फरिदाबादमधील कार विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. तसेच, दिल्लीतील सर्व ‘सेकंड हँड’ कार विक्रेत्यांना गेल्या काही काळातील व्यवहारांचे सर्व तपशील सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
डॉक्टरांशी केवळ व्यावहारिक संबंध
दिल्ली स्फोटापूर्वी तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांशी केवळ व्यावहारिक संबंध होते, असे स्पष्टीकरण ‘अल फलाह’ विद्यापीठाने दिले आहे. विद्यापीठाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ ही जबाबदार संस्था असून, तपास यंत्रणांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल, असे विद्यापीठाने म्हटले आहे.
हरियाणामधून मौलवी ताब्यात
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी हरियाणामधून मेवात येथून मौलवी इश्तियाक याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस श्रीनगरला घेऊन आले आहेत. अल फलाह विद्यापीठाच्या आवारात एका भाड्याच्या घरात इश्तियाक राहत होता. याच्या घरातून पोलिसांना अडीच हजार किलो स्फोटके सापडली होती. या प्रकरणात पकडण्यात आलेला इश्तियाक हा नववा आरोपी आहे.
