अमेरिकेच्या सिनेटरचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र
भारतात धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्क दडपण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने त्या देशाशी वाढत चाललेल्या राजनैतिक संबंधांचे फेरमूल्यांकन करावे, अशी सूचना रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटरने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाला केली आहे.
अमेरिकेने आपली भूमिका आणि भारताशी असलेले संबंध यांचा जबाबदारीने विचार केला पाहिजे, असे ओक्लाहोमातील रिपब्लिकन सिनेटर जेम्स लँकफोर्ड यांनी ओबामा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अमेरिकेचे भारत आणि क्युबाशी राजनैतिक संबंध वाढत असून त्या दोन्ही देशांमध्ये मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यांची मोठय़ा प्रमाणावर पायमल्ली होत आहे.
त्यामुळे संबंधांचे फेरमूल्यांकन करावे, असे आवाहन लँकफोर्ड यांनी पत्राद्वारे ओबामा यांना केले आहे.
भारतात धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याने अमेरिकेने भारताशी असलेल्या आपल्या संबंधांचा वापर करून भारतातील सर्व धर्माच्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी पाठिंबा द्यावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा आरोप
अमेरिकेतील प्रत्येक राज्यात कनिष्ठ आणि वरिष्ठ असे दोन सिनेटर आहेत. वरिष्ठ सिनेटरच्या तुलनेत ज्या सिनेटरचा कालावधी कमी असेल त्याला कनिष्ठ सिनेटर समजले जाते. भारतात धार्मिक विविधता असलेला समाज आहे आणि धर्मनिरपेक्ष सरकार आहे, असे असताना तेथे मानवी हक्कांचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन होत आहे, असे निरीक्षणही लँकफोर्ड यांनी नोंदविले आहे.