‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप निर्थक आणि चुकीचे आहेत,’ असा पुनरुच्चार करत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अशोक गांगुली यांनी आणखी वाद वाढू नयेत यासाठीच पश्चिम बंगालच्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे मंगळवारी सांगितले.
एका प्रशिक्षणार्थी महिला वकिलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर न्या. गांगुली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. गेल्याच आठवडय़ात केंद्रीय मंत्रिमंडळाने गांगुली यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अखेर सोमवारी संध्याकाळी गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यपालांकडे सोपवलेल्या राजीनामापत्राची प्रत मंगळवारी ‘पीटीआय’ला वाचून दाखवली.
‘‘माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. प्रसारमाध्यमांचा वापर करून हे आरोप मोठे करण्यात आले. मात्र हे आरोप निराधार आणि तथ्यहीन आहेत. मला हटवण्यासाठी या आरोपांचा आधार घेऊन केंद्र सरकार राष्ट्रपतींकडे शिफारस करणार होते. मात्र ते असमर्थनीय आणि अयोग्य आहे,’’ असे गांगुली यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. कुटुंबात शांततेचे आणि आनंददायी वातावरण निर्माण होण्यासाठी आणि अजून वाद वाढू नये यासाठीच राजीनामा दिला आहे, असे गांगुली म्हणाले. ‘‘मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. मात्र मी माझे काम सन्मानाने करू इच्छितो. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी दुखावलो गेलो,’’ असे गांगुली यांनी सांगितले.
दरम्यान, गांगुली यांचा राजीनामा राज्यपाल एम. के. नारायणन यांनी स्वीकारला आहे. पश्चिम बंगालच्या राजभवनातील प्रवक्त्याने ही माहिती दिली. राजीनामा स्वीकारून राज्यपालांनी पश्चिम बंगाल सरकारला याबाबत माहिती दिली आहे.
गांगुलींच्या राजीनाम्याने चॅटर्जी नाराज, तृणमूलकडून स्वागत
न्या. गांगुली यांना पदाचा राजीनामा द्यायला लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही पुराव्यांशिवाय किंवा चौकशीशिवाय त्यांना राजीनामा द्यावा लागला, असे सांगत लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यात येत असेल, तर त्याला त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असा आपला कायदा सांगतो. मात्र या प्रकरणात कोणतीही चौकशी झाली नाही किंवा खटला न चालवता गांगुली यांना राजीनामा द्यावा लागला, असे चॅटर्जी म्हणाले.पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मात्र गांगुली यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. गांगुली यांनी राजीनामा दिल्याने त्यांची प्रतिष्ठाच जपली गेली आहे, असे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.