भारत आणि अन्य पाच दक्षिण आशियाई राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध सिंगापूरने मागे घेतले आहेत. सिंगापूरमध्ये येण्याआधीच्या १४ दिवसांच्या कालावधीत भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतून प्रवास केलेल्या व्यक्तींना आता सिंगापूरमध्ये प्रवेश करता येईल किंवा सिंगापूरमार्गे प्रवास करता येईल, असे सिंगापूरच्या आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केले.  

सिंगापूरच्या आरोग्य विभागाने करोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर निर्बंधित देशांच्या यादीतून भारतासह अन्य सहा देशांतील प्रवाशांना वगळण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी या देशांतून सिंगापूरमध्ये येणाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार या व्यक्तींना दहा दिवस सरकारमान्य केंद्रात वेगळे राहावे लागणार आहे. याआधी या सहा देशांतील प्रवाशांना सिंगापूरमध्ये प्रवेशबंदी होती. या देशांतील करोना नियंत्रणाची स्थिती सुधारत असल्याने प्रवेश निर्बंध मागे घेण्यात आल्याची माहिती सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी आभासी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, बुधवारपासून निर्बंधात सूट मिळालेल्या देशांत मलेशिया आणि इंडोनेशियाचा समावेश आहे.