श्रीनगर : काश्मीरमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी रविवारी लागोपाठ चौथ्या दिवशी सुरक्षा दले तैनात होती. कट्टरतावादी व फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन श्रीनगरच्या काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती तसेच शनिवारी मोबाइल, इंटरनेट बंद करण्यात आले होते.

गिलानी यांचा दफनविधी त्यांच्या हैदरापोरा परिसरातील एका मशिदीजवळ करण्यात आला असून आता लोकांच्या हालचालींवरचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे अडथळे अद्याप काढण्यात आलेले नाहीत. शहर व इतर परिसरात मोठय़ा प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.

काश्मीर खोऱ्यात वाहतूक वाढली असून सार्वजनिक वाहतूक मात्र बंद आहे. शहराच्या काही भागांत रविवारी दुकाने उघडण्यात आली. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पोलिसांनी सांगितले, की काश्मीर मीडिया सव्‍‌र्हिस ही समाज माध्यम संस्था खोटय़ा बातम्या पसरवून अशांतता निर्माण करू पाहत आहे, तसेच समाजकंटकांची माथी भडकवण्याचा त्यांचा उद्देश आहे.

काश्मीरचे पोलीस उप महानिरीक्षक विजय कुमार यांनी शुक्रवारी सांगितले, की रविवारी इंटरनेट व इतर सेवांचा आढावा घेतल्यानंतर बंदी मागे घेतली जाऊ शकते.