Crime News Chennai: वडिलांच्या हत्येच्या सतरा वर्षांनंतर, महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या १९ वर्षांच्या युवनेशने त्याच्या वडिलांचा मारेकरी राजकुमारची हत्या केली आहे. २००८ मध्ये अमीनजीकराई येथे ४७ वर्षीय मृत गुंड राजकुमारने आरोपी युवनेशचे वडील सेंथिलकुमार यांची हत्या केली होती. तेव्हा युवनेश दोन वर्षांचा होता. तमिळनाडूतील चेन्नईच्या टी. पी. छथिराम पोलिसांनी गुरुवारी आरोपी युवनेश, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि इतर दोघांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी राजकुमारने युवनेशला त्याच्या घराजवळ मित्रांसोबत असताना टोमणे मारले, तेव्हापर्यंत सूडाच्या हत्येचे कोणतेही संकेत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. राजकुमार २००८ मध्ये केलेल्या युवनेशच्या वडिलांच्या हत्येचा उल्लेख सातत्याने करत असे. यामुळे संतप्त होऊन आणि दीर्घकाळापासून असलेल्या द्वेषातून युवनेशने त्याच्या मित्रांसोबत राजकुमारच्या हत्येची योजना आखली, असे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबातील सदस्यांसमोरच…

बुधवारी, राजकुमार त्याच्या घराबाहेर मोटारसायकल दुरुस्त करत असताना, युवनेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. सुरुवातीला राजकुमार पळून जाण्यात यशस्वी झाला आणि घरात लपला. पण, युवनेश आणि त्याच्या साथीदारांनी घरात घुसून त्याला स्वयंपाकघरात कोंडले आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसमोर हल्लेखोरांनी राजकुमारची हत्या केली आणि पळून गेले.

चिथावणीखोर वक्तव्यांमुळे

दरम्यान, टी. पी. छथिराम पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नसीमा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले आहे. पथकाने बीबीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी युवनेश, त्याचे सहकारी साईकुमार (२०) आणि एका १७ वर्षीय मुलाला अटक केली आहे. हे सर्वजण त्याच परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की हा हल्ला युवनेशच्या वडिलांच्या हत्येपासून निर्माण झालेल्या दीर्घकालीन रागाचा परिणाम होता. राजकुमारच्या अलिकडच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे युवनेशला सूड उगवण्यासाठी हत्येचा कट रचण्यास प्रवृत्त केले.

टोळीतील आणखी सहा जणांचा शोध सुरू

या टोळीचा भाग असल्याचा संशय असलेल्या आणखी सहा जणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.