पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात खाप पंचायतीने एक विचित्र निर्णय दिल्याचं समोर आलं आहे. तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी करताना ‘बलात्काराचा बदला बलात्कार’ असा अजब निकाल येथील खाप पंचायतीने दिला होता. या प्रकरणात जवळपास 12 जणांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्यांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे.

dawn.com ने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरपासून जवळपास 200 किलोमीटर दूर पीरमहल येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली. पोलीस तक्रारीनुसार 20 मार्च रोजी पीरमहलच्या गरीबाबाद परिसरात एका व्यक्तीने परिसरातीलच एका तरूणीवर बलात्कार केला. पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी व्यक्तीच्या कुटुंबियांनी न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवण्याची विनंती पिडीतेच्या कुटुंबियांना केली आणि प्रकरण खाप पंचायतीकडे नेण्यात आलं. त्यावर 21 मार्च रोजी खाप पंचायतीने बदला म्हणून पीडितेच्या भावाला आरोपी व्यक्तीच्या बहिणीवर बलात्कार करण्याची अजब शिक्षा सुनावली.

यानंतर, या घटनेबाबत एकमेकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार नाही अशा आशयाचे कागदपत्र दोन्ही कुटुंबीय बनवत असताना पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उप-निरिक्षक शौकत अली जावेद यांनी स्वतः एफआयआर दाखल केला.