लहानपणी चार्ली चॅप्लिन यांचा चित्रपट पाहून रिचर्ड अॅटनबरो प्रभावित झाले. या माध्यमाची ताकद त्या वयातही त्यांना जाणवली आणि जे करायचं ते याच पडद्यावर, हा निर्णयही मनाने घेतला. चॅप्लिनच्या वाटेने निघालेल्या रिचर्ड यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून स्वत:चा मार्ग गवसला आणि त्यातून भारतीयांनाही ‘गांधीं’चं पुन्हा दर्शन झालें!
‘द माऊसट्रॅप’ या नाटकात त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी भूमिका केली व वयाच्या अठराव्या वर्षी व्यावसायिक रंगभूमीवर ते आले. १९४२मध्ये ‘इन वीच वुई सव्र्ह’ या चित्रपटातील अभिनयाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. १९४५ मध्ये त्यांचा अभिनेत्री शीला सिम यांच्याशी विवाह झाला. नंतर ते चित्रपट निर्मितीत उतरले व त्यांनी १९५० च्या सुमारास ‘बीव्हर फिल्म’ ही कंपनी स्थापन केली. ‘द लीग ऑफ जेंटलमन’ (१९५९) हा निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘द अँग्री सायलन्स’(१९६०) व ‘व्हीसल डाऊन द विंड’(१९६१) हे चित्रपट त्यांनी तयार केले. त्यांनी एकूण १३ चित्रपटांची निर्मिती केली व ७८ चित्रपटांत भूमिका केल्या. २००७ मध्ये त्यांनी दिग्दर्शक व निर्माते म्हणून ‘क्लोजिंग द रिंग’ हा शेवटचा चित्रपट केला, त्यात शिर्ले मॅकलेन, ख्रिस्तोफर प्लमर व पीट पोस्टलेवेट यांच्या भूमिका होत्या.
अखेरचे दिवस..
लंडनच्या नॉर्थवूड उपनगरात ‘डेनव्हिल हॉल’ ही भव्य वास्तू आहे. सत्तरी पार केलेल्या कलावंतांना इथे अल्प किंवा प्रदीर्घ कालावधीसाठी राहण्याची सोय आहे. इथे त्यांना आवडेल असे वातावरण, वैद्यकीय सुविधा यांचा लाभ होतो. विशेष म्हणजे सर अॅटनबरो आणि त्यांच्या पत्नी यांनी या वास्तूसाठी निधी उभारला होता. याच वास्तूत शीला २०१२पासून राहू लागल्या आणि प्रकृती ढासळत गेल्यावर २०१३मध्ये मालमत्ता विकून सर रिचर्ड अॅटनबरोही त्यांच्यासोबत येथेच राहू लागले. सहा वर्षांंपूर्वी जिन्यावरून पडल्याने ते व्हीलचेअरवर होते. त्यानंतर ते कोमात गेले पण नंतर त्यातून बाहेर आले.
पंचा नेसणाऱ्या किरकोळ शरीरयष्टीच्या गव्हाळ रंगाच्या माणसावर काढलेला चित्रपट पाहण्यासाठी कुणीही येणार नाही, असे हॉलीवूड दिग्दर्शकांनी अॅटेनबरो यांना सांगितले होते. पण ‘गांधी’ चित्रपट हे त्यांचे जीवनस्वप्न होते, त्यासाठी ते झपाटले होते. त्यांनी वीस वर्षे त्यासाठी पैसा जमवला, घर गहाण ठेवले, या चित्रपटाचा एकूण खर्च दोन कोटी डॉलर झाला पण त्याच्या वीस पट पैसा या चित्रपटाने कमावला. यातच अॅटेनबरो जिंकले. त्यांनी हॉलीवूडच्या दिग्दर्शकांना त्यांची जागा दाखवली. वडिलांबरोबर ते लंडनला एकदा चार्ली चॅप्लिनचा ‘द गोल्ड रश’ हा चित्रपट पाहण्यासाठी आले व तेव्हापासून त्यांनी चित्रपटाचा मार्ग निवडला तो कायमचाच. त्यांनी सत्यजित रे दिग्दर्शित ‘शतरंज के खिलाडी’ चित्रपटात भूमिका केली होती. प्रिन्स चार्लस् यांच्या सांगण्यावरून त्यांनी ‘प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना’ हिला लोकसंभाषणाची कला शिकवली व भूसुरुंगाविरोधात मोहीम हाती घेण्यासाठी प्रेरणा दिली होती. ‘ज्युरासिक पार्क’ या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांचा नव्या पिढीला परिचय झाला होता.
अॅटेनबरो यांची भूमिका असलेले चित्रपट
* इन वीच वुई सव्र्ह
* मिरॅकल ऑन थर्टी फोर्थ स्ट्रीट
* ब्रायटन रॉक
* द ग्रेट एस्केप
* १० रिलींग्टन प्लेस
* शतरंज के खिलाडी
* ज्युरासिक पार्क
* एलिझाबेथ
अॅटेनबरो हे चित्रपट क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ‘ब्रायटन रॉक’ या चित्रपटात केलेली भूमिका ही सर्वाच्या स्मरणात राहणारी होती. त्यांनी ‘गांधी’ चित्रपटाचे केलेले दिग्दर्शन चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटवणारे होते. अॅटेनबरो हे ब्रिटनच्या चित्रपटसृष्टीतील वलयांकित व्यक्तिमत्त्व होते – ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून