रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिला क्रमांकाचे स्थान मिळवले असून, यंदाच्या यादीचे वैशिष्ट म्हणजे पतंजली आयुर्वेदाचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनीही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नावावरील संपत्तीमुळे ते माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. आता फोर्ब्सच्या यादीमध्येही त्यांचा समावेश झाल्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वाधिक २२.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागला आहे. संघवी यांच्याकडे १६.९ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. भारतातील यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हिंदूजा बंधुंचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण १५.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
योगगुरू बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने अलीकडच्या काळात विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांमुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का बसला आहे. पतंजलीमध्ये रामदेव यांच्यासोबत सहसंस्थापक असलेले आचार्य बाळकृष्ण यांच्या नावावर २.५ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. यादीमध्ये आचार्य बाळकृष्ण यांचा तिसरा क्रमांक आहे. त्यांच्याकडील एकूण उत्पन्नापैकी सर्वाधिक ९७ टक्के ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतूनच मिळाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
यादीतील व्यक्तींनी स्वतः दिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळवलेल्या आणि शेअरबाजारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संपत्ती निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये कंपनीतील समभाग आणि आर्थिक स्थिती या दोन्हींचा विचार करण्यात आला आहे, असे फोर्ब्सने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने जिओ ही ४ जी सेवा सुरू केली होती. यामुळे देशातील दूरसंचाल क्षेत्र ढवळून निघाले असून, या क्षेत्राला सध्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे.
सन फार्मास्युटिकल्सच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे दिलीप संघवी यांच्या संपत्तीत आधीच्या तुलनेत १.१ अब्ज डॉलरने घसरण झाली असल्याचेही यादीवरून दिसून आले आहे. यादीमध्ये याआधी तिसऱ्या क्रमांकवर असलेले अझीम प्रेमजी आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती १५ अब्ज डॉलर असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.