पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
बांगलादेशात रोणू या चक्रीवादळाने २४ बळी घेतले असून इतर १०० जण जखमी झाले आहेत. वादळाचा जोर दुसऱ्या दिवशी ओसरला आहे. बांगलादेशच्या दक्षिण किनारपट्टीला वादळाने फटका दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून अधिकाऱ्यांनी पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ८८ कि.मी होता. बरीसाल व चितगाव येथे वादळाचा सर्वात मोठा फटका बसला असून अनेक भागांत मोठय़ा प्रमाणात पाऊसही झाला आहे.
सकाळपासून वादळाचा वेग वाढला असून २४ बळी गेले आहेत असे बांगलादेश न्यूजने म्हटले आहे. उष्णकटीबंधीय वादळ आज जमिनीलगत येत गेल्याने त्याची तीव्रता कमी झाली. वायव्य चितगावमध्ये मोठी हानी झाली असून तेथे वाऱ्यांचा वेग ताशी ८० किलोमीटर होता, त्या ठिकाणी नऊ जण ठार झाले तर भोला, नोआखाली, कॉक्स बझार जिल्ह्य़ात प्रत्येकी तीन जण मरण पावले आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले की, पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक गावांतील झोपडय़ा वादळाने भुईसपाट झाल्या. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, चितगाव येथे १० पेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत. भोला येथे एक मूल व महिला असे दोन जण मरण पावले तर पटुआखाली येथे तीनशे कुटुंबांना फटका बसला तर रंगाबाली येथे भरतीच्या लाटा उसळल्या. चितगाव येथील शहा अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ तूर्त बंद करण्यात आला आहे. वादळ दिवसा आल्याने प्राणहानी कमी झाली कारण सरकारने अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* सागरी पातळी भूगोलाचा विचार करता बांगलादेश हा बंगालच्या उपसागराच्या त्रिकोणी डोक्याजवळ असल्याने त्याला सतत वादळांचे तडाखे बसत असतात.
* यापूर्वी १९७० व १९९१ च्या वादळात अनुक्रमे पाच लाख व १ लाख ४० हजार लोक प्राणास मुकले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roanu cyclone half a million flee in bangladesh
First published on: 23-05-2016 at 00:03 IST